काणकोणचे पारंपरिक मूर्तिकार मनोज प्रभुगावकर यांची मागणी : सरकारने अल्पदरात माती उपलब्ध करावी
काणकोण : संपूर्ण गोव्यात साधारणपणे एक लाख इतक्या गणेशमूर्ती पूजल्या जातात. त्यातील जवळजवळ 50 हजार इतक्या मूर्ती ‘पीओपी’च्या असतात. सरकारला जर खऱ्या अर्थाने पारंपरिक मूर्तिकारांना प्रोत्साहन आणि चालना द्यावीशी वाटत असेल, तर प्रथम त्यांनी गोव्यात येणाऱ्या ‘पीओपी’च्या मूर्तींवरील बंदीची कडकपणे अंमलबजावणी करावी. आपण गणपतीची पूजा करतो याचाच अर्थ एका परीने मातीची म्हणजे निसर्गाची पूजा करत असतो. त्यामुळे मातीशी इमान असलेले गणेशभक्त मातीच्याच गणेशमूर्तींना पसंती देत असतात आणि संपूर्ण गोव्याच्या विविध भागांत मिळून अंदाजे 50 हजार इतक्या मातीच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात, असे माशे, काणकोण येथील पर्यावरणप्रेमी व मूर्तिकार मनोज प्रभुगावकर यांनी सांगितले.
पारंपरिक मूर्तिकारांना गोव्याच्या हस्तकला महामंडळामार्फत 250 मूर्तींसाठी प्रत्येकी 100 रु. याप्रमाणे मानधन दिले जाते. मागच्या वर्षीचे मानधन अद्याप मिळालेले नाही. मात्र या मानधनात वाढ करायला हवी. चित्रशाळेसाठी आपण स्वतंत्र शेड उभारली आहे. जे मूर्तिकार 5-10 मूर्ती बनवितात ते आपल्या राहत्या घरातच मूर्ती बनवितात. आपल्याला ते शक्य नाही. त्यासाठी आपण स्वतंत्र जागा तयार केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आपला मुलगा अमोघ प्रभुगावकर ही गणेशमूर्ती बनविणारी चौथी पिढी आहे. आपली पत्नी आपल्याला मूर्ती घडवायला त्याचप्रमाणे रंगवायला देखील साथ करत असते. अशा प्रकारे नवीन पिढीने या क्षेत्रात यायचे झाल्यास सरकारने देखील अशा पारंपरिक मूर्तिकारांना प्रोत्साहन द्यायला हवे. ही पारंपरिक कला जर टिकून राहायची असेल आणि नवीन पिढीने त्याकडे वळावे असे सरकारला वाटत असेल, तर सरकारने अल्पदरात माती उपलब्ध करून द्यायला हवी. लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे मत प्रभुगावकर यांनी व्यक्त केले.
आता सावंतवाडीच्या मातीचा वापर
मनोज प्रभुगावकर साधारणपणे 180 ते 200 इतक्या मूर्ती बनवितात. पूर्वी शेजारच्या जोयडा, कुंभारवाडा येथील कामगार आणले जायचे. कोविड नंतर हे कामगार यायचे बंद झाले. शिवाय यापूर्वी चावडी, काणकोण येथे ज्या ठिकाणी सध्या रवींद्र भवन उभारले जात आहे. तेथील माती आणली जायची. परंतु ती माती काढणे आता बंद झाले आहे. त्यानंतर शेजारच्या माजाळी येथील शेतातून माती आणली जायची. परंतु वाढते प्रदूषण, मातीत मिसळणारे प्लास्टिक यामुळे ती माती आणणे देखील बंद झाले, सध्या सावंतवाडी येथून माती भुकटी स्वरुपात आणली जाते. त्याचा लगदा तयार केला जातो आणि त्या मातीपासून गणेशमूर्ती बनविल्या जातात, असे प्रभुगावकर यांनी सांगितले.
यंदाही गणेशभक्तांना महागाईची झळ
मागच्या वर्षापेक्षा मातीचाच दर 30 टक्के इतका वाढला आहे. कामगारांचा दर वाढला आहे. रंगाचे दर गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना यंदा देखील महागच मूर्ती घ्यावी लागेल, असे त्यांनी सांगितले. त्यातच पावसाची अधूनमधून रिपरिप, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे एकंदर कामावर परिणाम होत असल्याच्या बहुतेक मूर्तिकारांच्या तक्रारी आहेत. आपण कमीत कमी 1500 रु. इतका दर ठेवलेला आहे. लोलये, पैंगीण एवढेच नव्हे, तर मडगाव येथून देखील आपल्या मूर्तींना मागणी आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आपल्या जवळजवळ सर्व मूर्ती घडवून तयार झाल्या आहेत. आता मूर्ती रंगविण्याचे काम चालले आहे, असे प्रभुगावकर यांनी स्पष्ट केले.
काणकोण तालुक्यात चार रस्ता येथे स्व. रमेश च्यारी यांचे सुपुत्र मनोज च्यारी, रुपेश च्यारी हे भव्य मूर्ती बनवायला प्रसिद्ध आहेत. याकामी त्यांना पूर्ण कुटुंब सहकार्य करत असते. त्याशिवाय पैंगीण येथे चंद्रकांत नाईक, मुकेश नाईक, खावट येथे जालंदर वझे, माशे येथे बाळकृष्ण अय्या, अवें-खोतीगाव येथे वेळीप बंधू, इडडर येथील च्यारी कुटुंबीय, आगोंद येथे धनंजय पागी व त्यांचे मुलगे, खोल येथे प्रदीप प्रभुदेसाई, पर्तगाळी येथे स्व. राम नाईक यांच्या पत्नी श्रद्धा नाईक व मुलगा, पोळे येथे प्रसन्न पागी आणि अन्य मूर्तिकार मागील कित्येक वर्षांपासून ही पारंपरिक कला जपत आलेले आहेत. सध्या या कामाकडे नवीन पिढी विशेष लक्ष देत नाही. त्यातच सरकारचे प्रोत्साहन नसल्यामुळे या मूर्तिकलेच्या भवितव्याच्या बाबतीत काळजी वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.