चित्ररथ मिरवणूक सुरळीत, वेळेत पार पडण्यासाठी शिस्त आवश्यक : मिरवणुकीदरम्यान शिवरायांचा जाज्वल्य इतिहास, पराक्रम अधोरेखित व्हावा ही तमाम सुजाण बेळगावकरांची इच्छा
मनीषा सुभेदार /बेळगाव
जय जय शिवराया…. श्रम जाती वाया…. या तरुण भारतच्या लेखमालिकेने एका महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडली. शिवजयंती चित्ररथ मिरवणूक सुरळीत व वेळेत पार पडावी, त्यामध्ये शिस्त असावी, मिरवणुकीदरम्यान शिवरायांचा जाज्वल्य इतिहास, पराक्रम अधोरेखित व्हावा, ही तमाम सुजाण बेळगावकरांची इच्छाच ‘तरुण भारत’ने व्यक्त केली.
यंदा मिरवणुकीत बेशिस्तीचे दर्शन घडले. वेळेचे नियंत्रण सुटले. शिवाय डीजेवर ज्या पद्धतीने तरुणाई अंगविक्षेप करत होती, ते सर्व खेदजनक होते. शिवचित्ररथ मिरवणुकीत सहभागी तरुणाईला धुराची वलये काढणे शोभणार नाही. यावर तर सर्वांचे एकमत झाले. तरुण भारतने महामंडळ, अध्यक्षांसह सर्वांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. ईएनटी तज्ञ व हृदयरोगतज्ञ यांनी दिलेला इशारा लक्षात घ्यायला हवा. लहान मुलांचे डॉल्बीच्या दणदणाटावर नाचण्याचे कौतुक न करता त्यांना पालकांनी रोखले नाही तर मुले बहिरी होऊ शकतात, याचे भान आता तरी बाळगले जावे. डीजे नको असे कोणाचेच म्हणणे नाही. कारण एखाद्याच्या व्यवसायावर टाच आणण्याचा अधिकार कोणालाच नाही. कोणी कोणता व्यवसाय करावा याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. फक्त आपले स्वातंत्र्य दुसऱयांच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करणारे असू नये, इतकीच अपेक्षा आहे. लवकरच गणेशोत्सव येईल. निदान त्या वेळी तरी शिस्त पाळली जाईल, अशी निश्चितच आशा आहे. दरम्यान तरुण भारतने डीजे असोसिएशनच्या अध्यक्षांशीही संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया आवर्जुन घेतली. त्यांचे जे म्हणणे आहे ते महामंडळाने आणि पोलीस प्रशासनाने लक्षात घ्यायला हवे.
एकूणच या प्रश्नावर समाज, वाचकांमध्ये विचार मंथन झाले. अनेकांनी दूरध्वनीवरून तरुण भारतला धन्यवाद दिले. चित्ररथावर तासनतास थांबून ताटकळलेल्या मुलांचा हिरमोड झाला. याबद्दलही अनेकांनी खंत व्यक्त केली. एसपीएम रोडवरील लोहार कुटुंबीयांनी तसे तरुण भारतला कळविले. निलजीचे ऍड. लक्ष्मण पाटील यांनी तरुण भारतने हा विषय मांडला. याबद्दल समाधान व्यक्त करून अशा पद्धतीने प्रबोधन व्हावे, अशी आशा व्यक्त केली.
हे वृत्तांकन करण्यामागे समाजातील गैरप्रवृत्ती दूर क्हाव्यात व इतिहास जाणून घेताना संस्कृतीही पुढे जावी इतकीच अपेक्षा होती. वाचकांनी याला भरघोस प्रतिसाद दिला. याचे समाधान व्यक्त करतानाच काही परिवर्तन होईल, ही आशा आहे. याच संदर्भात शिवाजी गौंडाडकर व डॉल्बी असोसिएशनचे अध्यक्ष श्याम गौंडाडकर यांचे म्हणणे काय आहे हे सुद्धा पहायला हवे.
प्रबोधन करून सर्वोत्कृष्ट चित्ररथ काढण्याचे प्रयत्न व्हावेत

बेळगावात गेल्या वीस-बावीस वर्षांचा मिरवणुकीचा इतिहास पाहिल्यास आपल्या साऱयांच्या लक्षात येईल की, 2004 पूर्वी काही ठराविक गल्ल्यातील शिवजयंती उत्सव मंडळे मिरवणुकीत भाग घ्यायची. याची संख्या अवघी 23 होती. मिरवणूक पाहणाऱया दर्शकांची संख्या ही तशी तोकडीच. त्यामुळे मिरवणूक मार्गांवर एखाद्या ठिकाणी बसून राहिले तरी संपूर्ण मिरवणूक बघायला मिळायची. त्यानंतर 2004 मध्ये शिवजयंती उत्सवात प्रत्यक्ष सक्रिय असणाऱया कार्यकर्त्यांनी शिवजयंती चित्ररथ महामंडळाची स्थापना केली.
संस्थापक अध्यक्ष म्हणून शिवाजी गौंडाडकर यांची निवड झाली. महामंडळाच्या स्थापनेनंतर मंडळांचे प्रश्न, कार्यकर्त्यांच्या अडचणी, प्रशासकीय नियम, कायदा, राजकीय दबाव अशा अनेक प्रश्नांवर विचार विनिमय व्हायचे. मिरवणूक होण्याआधी अनेक बैठका व्हायच्या. कार्यकर्त्यांचे प्रश्न महामंडळाच्या माध्यमातून प्रशासनापुढे मांडले जायचे. त्यासाठी कायदेशीर पुरावे आणि तथ्थे सादर केली जाऊ लागली. चित्ररथावरील प्रसंगांची स्क्रिप्ट, बॅग्राऊंड म्युझिक, स्टुडिओत मागणीनुसार तयार केले जाऊ लागले. त्यामुळे अवघ्या 5 ते 6 प्रसंगापुरते सिमित असणारे देखावे संपूर्ण शिवचरित्र उलगडून दाखवू लागले.
त्यामुळे चित्ररथावर प्रसंग सादर करणाऱया कलाकारांची संख्या लक्षणीय वाढली. साहजीकच या सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी मंडळाच्या जबाबदार पदाधिकाऱयांवर आल्यामुळे दारू पिऊन नाचणे, धिंगाणा घालणे अशा विकृत गोष्टी अस्पृश्य ठरविल्या जाऊ लागल्या. गल्लोगल्लीची मंडळे एकमेकांच्या मदतीस धावू लागली. कलाकारांची देवाण-घेवाण, पोशाखांची देवाण-घेवाण, ट्रक, ट्रॉली यांची मदत अशा सर्व पातळय़ावर बेळगावची मंडळे एकमेकास साहाय्य करू लागली. याचे सारे श्रेय निःपक्ष कार्य करणाऱया शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या महामंडळाला जाते.
आजची मिरवणूक नेतृत्वहिन आहे. त्यामुळेच मिरवणूक दिशाहिन झाली आहे. डीजे लावणाऱया मंडळांवर बंदी घालण्याऐवजी त्यांचे प्रबोधन करून त्यांच्याकडूनच सर्वोत्कृष्ट चित्ररथ काढण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. हे प्रयत्न याआधी महामंडळाच्या माध्यमातून आम्ही केले. म्हणूनच आज 25 चित्ररथावरून 73 चित्ररथ मिरवणुकीत आपल्याला पहायला मिळतात.
आता प्रश्न उरला तो मिरवणुकीतील वेळेची दिरंगाई, बेशिस्तपणा याचा. माझ्या अभ्यासानुसार 2014 ते 2015 सालापासून बेळगावच्या शिवजयंती मिरवणुकीत ढोल-पथकांचा शिरकाव झाला आहे. सुरुवातीला आकर्षक वाटणारी ही ढोल-पथके आता डोईजड आहेत. प्रत्येक ढोल-पथकांमध्ये ध्वजपथक, ढोल, नगारे असे विविध प्रकार असतात. या ढोल-पथकांची संख्या आता वाढू लागली आहे. परगावाहून ही पथके येथील स्थानिक मंडळे मागवू लागली आहेत. या पथकांवर कोणाचेही नियंत्रण रहात नाही. परिणामी बेशिस्तपणा वाढीस लागणार आहे, मिरवणूक चित्ररथांसाठी आहे की ढोल-पथकांच्या प्रदर्शनाकरिता आहे हे आधी स्पष्ट होणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील वर्षी या ढोल-पथकांना मिरवणुकीत सहभागी होण्याची परवानगी देवू नये, शिवाय जे मंडळ असा प्रयत्न करेल त्यांना चित्ररथाची परवानगी नाकारावी, तरच मिरवणुकीतील बेशिस्तपणा आणि होणारा विलंब टाळता येईल.
– शिवाजी गौंडाडकर, शिवजयंती चित्ररथ महामंडळचे अध्यक्ष
आम्हाला नियमावली ठरवून द्या

शिवजयंती उत्सव मंडळांनी मागणी केल्यानंतरच आम्ही डीजे पुरवितो. महत्त्वाचे म्हणजे चित्ररथावर एखादा देखावा किंवा प्रसंग सुरू झाला की कोणीही डीजे लावत नाही. आम्ही आवाजाच्या मर्यादेवर आग्रही असतो. परंतु मंडळा-मंडळांमधील स्पर्धांमुळे, चुरशीमुळे कोणाचा आवाज मोठा, अशी चढाओढ सुरू होते आणि ही समस्या निर्माण होते.
डीजेमध्ये आम्ही दहा ते बारा लाख रुपयांचे कर्ज घेऊन गुंतवणूक केलेली आहे. आम्हाला हा व्यवसाय करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. समजा आम्ही स्पिकर आणि माईक दिला नाही तर मिरवणुकींना शोभाच येणार नाही. त्यामुळे परस्पर सहकार्य महत्त्वाचे आहे.
डीजे बंद करावा म्हणून पोलीस आमच्यावर दबाव आणतात. त्यामुळे चित्ररथ महामंडळ, शिवजयंती उत्सव मंडळ, अन्य संघटना यांनी एक बैठक घ्यावी व पोलीस प्रशासनाशी चर्चा करून आम्हाला सहकार्य करावे, यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न केले आहेत. आम्हाला एक मार्ग आणि नियमावली ठरवून द्यावी, त्याचे पालन आम्ही नक्की करू.
– श्याम गौंडाडकर, अध्यक्ष डीजे असोसिएशन
समाप्त !









