उबेर-रॅपिडोला धक्का, उच्च न्यायालयाच्या आदेशावर ’सर्वोच्च’ शिक्कामोर्तब
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय राजधानीत बाईक-टॅक्सीवरील बंदी कायम राहणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. प्रत्यक्षात यासंदर्भात सरकारने बजावलेल्या नोटीसला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. या निर्णयाला दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. रॅपिडो आणि उबेर यांसारख्या अॅप-आधारित सेवांनी सर्वसमावेशक धोरण तयार होण्यापूर्वी गैर-व्यावसायिक नोंदणी असलेल्या दुचाकींचा वापर करण्यास प्रतिबंध करावा अशी सरकारची इच्छा आहे. यापूर्वी 26 मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने रॅपिडोच्या एका कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली सरकारला नोटीस बजावली होती. या कायद्यांतर्गत दुचाकींना ‘परिवहन वाहन’ म्हणून नोंदणी करण्यापासून वगळण्यात आले होते. उच्च न्यायालयाने सरकारला याप्रकरणी अंतिम धोरण तयार करण्यास सांगितले होते. तसेच तोपर्यंत बाईक-टॅक्सी जमा करणाऱ्यांवर कोणतीही सक्तीची कारवाई केली जाणार नाही, असेही सांगितले होते.









