दयानंद स्वामी यांचे प्रतिपादन : उचगाव मळेकरणीदेवी उत्सवाची गोड महाप्रसादाने सांगता
वार्ताहर /उचगाव
पशुहत्या करून जिथे मांसाहारी जेवणावळी होत होत्या. त्याच ठिकाणी पशुहत्येवर निर्बंध घालून गोड जेवणावळीच्या स्वरूपामध्ये महाप्रसाद झाला. ही उचगाव गावच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना आहे. 104 वर्षाच्या परंपरेत बदल झाला आणि म्हणूनच या ठिकाणी मला पुन्हा पुन्हा यावसं वाटलं म्हणून आज मी पुन्हा या ठिकाणी येऊन येथील तमाम भाविक भक्तांना आशीर्वाद देण्याची संधी मिळाली. मळेकरणी मातोश्रींनी मला ती दिली. त्याबद्दल मी या उचगाव ग्रामस्थांचे धन्यवाद मानतो, असे मनोगत बेंगळूर येथील विश्व प्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष व विश्व गोरक्ष महापिठाचे मुख्य संचालक दयानंद स्वामी यांनी व्यक्त केले. उचगाव येथील मळेकरणीदेवी सार्वजनिक सप्ताह उत्सवाच्या सांगता समारंभामध्ये महाप्रसाद वितरणाच्या शुभप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
उत्सवाचा सांगता समारंभ बुधवार दि. 19 मार्च रोजी दुपारी झाला. यावेळी दयानंद स्वामी यांच्या हस्ते फीत कापून या महाप्रसादाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उचगाव ग्रामपंचायतच्या अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बुडाचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते युवराज कदम हे होते. याचबरोबर व्यासपीठावर बी. एस. होनगेकर, मनोज पावशे, उचगाव ग्रामपंचायतचे पीडीओ शिवाजी मडिवाळ, बाळासाहेब देसाई उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत संभाजी कदम, रामा कदम, मनोहर कदम, अशोक चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उचगाव आणि पंचक्रोशीतील जवळपास 20 हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. सूत्रसंचालन एन. ओ. चौगुले यांनी तर आभार एल. डी. चौगुले यांनी मानले.









