साताऱ्यातील 16 संघटनांची वज्रमुठ, डीजेवाल्यांची तंतरली
साताराः बाप्पांच्या मिरवणुकीवेळी शहरातील ज्येष्ठ, महिला, रुग्ण, लहान बालके यांना डीजेचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास बंद करण्यासाठी आणि डीजे बंदीसाठी सातारा शहरातील 16 संघटनांनी एकीची वज्रमुठ आवळली असून सोमवारी दुपारी साडे चार वाजता विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याचा निर्धार केला आहे.
दोन आठवड्यांपासून सातारा आणि परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक संघ आणि 16 संस्था डीजे या कर्ण कर्कश्श यंत्रणेविरोधात एकत्र आल्या आहेत. यापैकी काही संस्थांनी सोमवार दि. 4 ऑगस्ट आणि शुक्रवार दि. 8 ऑगस्ट रोजी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या डीजे बंदी संबंधात लेखी निवेदन सादर केले आहे. तरी दखील शासनाने डीजे बंदीबाबत निर्णय घेतलेला नाही.
त्यासाठी सर्व संस्थांनी मिळून एकत्रितपणे सोमवार दि. 18 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता गांधी मैदान राजवाडा ते पोवई नाका असा मोर्चा काढायचे ठरवले आहे. मोर्चा हा कोणताही दंगा न करता शांततेच्या मार्गाने केवळ घोषणा देत मार्गक्रमण करणार आहे. त्यादिवशी पोवई नाक्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांना त्यांच्या निवासस्थानी या सर्व संस्थांच्या वतीने डीजेवर बंदीसंबंधी निवेदन देण्यात येणार आहे.
त्यानंतर पोवई नाक्यावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला निषेध मोर्चामध्ये सहभागी नागरिकांकडून अभिवादन केले जाईल. ज्या सातारकर नागरिकांचा या डीजे यंत्रणेला मनापासून विरोध आहे अशा सर्व सातारकर नागरिकांनी या मोर्चामध्ये अवश्य सहभागी व्हावे असे आवाहन समन्वयक, डीजे विरोधी आंदोलन आणि कार्याध्यक्ष कार्यवाह ज्ञानविकास मंडळ, सातारचे प्रसाद चाफेकर यांनी केले आहे.
डीजेवाल्यांची तंतरली
कर्ज काढून आम्ही डीजे खरेदी केली, आम्ही अमूक बँकेकडून कर्ज घेतले, आमचा हाच व्यवसायाचा हंगाम आहे, त्यामुळे आम्ही नियमातूनच डीजे वाजवू, अशी काहीतरी पट्टी नेत्यांना डीजेवाले पढवू लागले आहेत.
कर्ज काढून आम्ही डीजे खरेदी केली, आम्ही अमूक बँकेकडून कर्ज घेतले, आमचा हाच व्यवसायाचा हंगाम आहे, त्यामुळे आम्ही नियमातूनच डीजे वाजवू, अशी काहीतरी पट्टी नेत्यांना डीजेवाले पढवू लागले आहेत.








