केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी सादर केला 18 वर्षांचा प्रगती अहवाल : काँग्रेसला केले लक्ष्य
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी भोपाळमध्ये भाजप सरकारच्या साडे अठरा वर्षांचा प्रगती अहवाल सादर केला आहे. या रिपोर्ट कार्डला गरीब कल्याण महाअभियान नाव देण्यात आले आहे. भाजपने एका बीमारू (आर्थिकदृष्ट्या मागास) राज्याला 20 वर्षांमध्ये विकसित राज्याच्या श्ा़sdरणीत आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे उद्गार शाह यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत काढले आहेत.
मध्यप्रदेशात सर्वाधिक 53 वर्षांपर्यंत काँग्रेसचे सरकार राहिले, परंतु त्यांच्या शासनकाळात मध्यप्रदेश बीमारू राज्याचा शिक्का मिरवत होते. बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तरप्रदेश यांचा या बीमारू राज्यांमध्ये समावेश होता. त्यावेळी या राज्यांना भारताचा विकास दर कमी करणारी राज्यं मानण्यात आले होते. 2003 मध्ये बंटाधारचे (दिग्विजय सिंह यांचा भाजपकडून असा उल्लेख) सरकार हटविले आणि तेव्हापासून मध्यप्रदेश बीमारू राज्याच्या प्रतिमेतून 20 वर्षांमध्ये बाहेर काढण्यात आल्याचा दावा शाह यांनी केला आहे.
दिग्विजय अन् कमलनाथ यांच्यावर निशाणा
श्रीयुत बंटाधार आणि कमलनाथ यांनी राज्यात काँग्रेसच्या शासनकाळात झालेल्या घोटाळ्यांवर उत्तर द्यावे. आरोग्य, उद्योग, युवा, शिक्षण अन् कृषी सर्वच क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर मध्यप्रदेशचा पाया रचण्याचे काम 20 वर्षांमध्ये झाले आहे. राज्याचा विकास करण्याचे काम आम्ही करणार आहोत असा विश्वास मी मध्यप्रदेशच्या जनतेला देण्यासाठीच येथे आलो आहे. 20 वर्षांमधील 10 वर्षे डबल इंजिन असलेले सरकार राहिले. पुढील निवडणूक बंटाधारपासून विकसित राज्य करण्याची निवडणूक आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात राज्यात प्रचंड कामे झाली आहेत. बंटाधार आणि कमलनाथ यांनी राज्याला विकासाच्या शर्यतीत मागे टाकण्याचे काम केले होते. परंतु आमच्या सरकारने मध्यप्रदेशच्या विकासाला चालना दिली असे म्हणत शाह यांनी दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.
गरीबीपासून संपूर्ण मुक्ती
2014 च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या 29 पैकी 27 तर 2019 मध्ये 29 पैकी 28 जागा भाजपला मिळाल्या होत्या. आता एका जागेची कमरता 2024 मध्ये मध्यप्रदेशची जनता पूर्ण करेल असा मला पूर्ण विश्वास आहे. आगामी निवडणूक गरीबीपासून संपूर्ण मुक्तीची निवडणूक आहे. मोदींच्या नेतृत्वात शिवराज सिंह चौहान यांनी राज्यात तळागाळापर्यंत प्रत्येक योजना पोहोचविली आहे. आगामी काळात आम्ही या विकासाच्या पायावर मोठी इमारती उभी करणार आहोत. येथील दरडोई उत्पन्न 11,700 रुपयांवरून 1 लाख 40 हजारपर्यंत पोहोचल्याचे उद्गार शाह यांनी काढले आहेत.
काँग्रेसकडून मागितला हिशेब
काँग्रेस सरकारच्या काळात गरीबांसाठीचे अन्नधान्य काँग्रेसचे नेते फस्त करायचे. काँग्रेसच्या काळात 52 लाख कुटुंबांना रेशनकार्डचा लाभ मिळत होता. आता ही संख्या एक कोटी 25 लाखावर पोहोचली आहे. काँग्रेसने आता स्वत:च्या 50 वर्षांचा रिपोर्टकार्ड सादर करण्याची हिंमत दाखवावी. आम्ही राजकारणात उत्तरदायित्वाची परंपरा उभी केली आहे. आमचे सरकार असलेल्या ठिकाणी आम्ही कामाचा हिशेब देतो. कमलनाथ यांनी 15 महिन्यांच्या शासनकाळात गरीब कल्याणाच्या योजना बंद करण्याशिवाय काहीच केले नाही. कमलनाथ यांचे सरकार हे करप्शन नाथ की सरकार होते अशी टीका शाह यांनी केली आहे.









