मडगाव : कुंकळळी पालिका क्षेत्रात वेक्टर बोर्न रोग टाळण्यासाठी कुंकळळी पालिका व बाळळी आरोग्य केंद्राने संयुक्तरित्या उपाय योजना हाती घेण्याची मागणी कुंकळळी ग्राहक मंचने केली होती. या मागणीला अनुसरून बाळळी आरोग्य केंद्राने पालिका क्षेत्रात फवारणीचे काम हाती घेतल्याने ग्राहक मंचने समाधान व्यक्त केले आहे. पालिका क्षेत्रातील व्यावसायिक आणि ग्राहकांना भेडसावणाऱ्या समास्यां दूर करण्याची मागणी कुंकळळी ग्राहक मंचने केली होती. खास करून स्वच्छता सुधारणे आणि वेक्टर बोर्न रोगांचे प्रतिबंध करण्याची मागणी केली होती. त्यावर बाळळी आरोग्य केंद्राने जलद कारवाई केली. कुंकळळी येथील व्यावसायिक प्रतिष्ठानसमोरील गटाराची दुरवस्था आणि त्यामुळे होणारी डासांची उत्पत्ती व या ठिकाणी पसलेल्या दुर्गंधीची माहिती ग्राहक मंचने बाळळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. तुलसीमता काकोडकर यांना दिली.
ग्राहक मंचच्या तक्रारीची दखल घेत आरोग्य अधिकाऱ्याने स्वच्छता निरीक्षक लक्ष्मीकांत यू. पागी यांना घटनास्थळी भेट देऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. स्वच्छता निरीक्षकांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फवारणीचे निरीक्षण केले. दरम्यान, कुंकळळी ग्राहक मंचने, कुंकळळी पालिकेचे मुख्याधिकारी जुवांव फर्नांडिस यांना पत्र लिहून तुंबलेले गटार साफ करण्यासाठी उपाययोजना करावी, जेणेकरून कुंकळळीच्या व्यापारी प्रतिष्ठानांना आणि ग्राहकांना त्रास होणार नाही अशी मागणी केली जाणार आहे. कुंकळळी पालिकेने शहराचे आरोग्य आणि स्वच्छता राखण्यासाठी सक्रिय पावले उचलली पाहिजेत असे ठाम मत कुंकळळी ग्राहक मंचने व्यक्त केले आहे. 2 ऑक्टोबरपासून पालिकेसह संयुक्त जनजागृती मोहीम राबविण्यासाठी बाळळी आरोग्य केंद्राकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय ही ग्राहक मंचने घेतला आहे. मलेरिया आणि डेंग्यू सारख्या वेक्टर बोर्न रोगाचा प्रसार रोखणे आवश्यक असल्याचे मत ग्राहक मंचने मांडले आहे.









