येळ्ळूर रस्त्यावरील गटारी पूर्ण झाल्यानंतर बळ्ळारी नाल्याची खोदाई आवश्यक
बेळगाव : आनंदनगर-वडगाव ते बळ्ळारी नाल्यापासून गटारीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता भाग्यनगर, नाझर कॅम्प, आनंदनगर, केशवनगर, अन्नपुर्णेश्वरीनगर येथील संपूर्ण पाणी बळ्ळारी नाल्याला जाणार आहे. याचबरोबर ड्रेनेजचे पाणीही जाणार असल्यामुळे यावर्षी बळ्ळारी नाल्याला आणखीन पूर वाढण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. तेव्हा पावसाळ्यापूर्वी बळ्ळारी नाल्याचीही खोदाई करावी, अशी मागणी होत आहे. बळ्ळारी नाल्याची खोदाई करावी यासाठी अनेकवेळा निवेदने दिली आहेत. खोदाई करण्यासाठी तत्कालीन पाठबंधारे मंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांना सूचना देखील केली होती. मात्र तीन वर्षे उलटली तरी त्याची खोदाई करण्यात आली नाही. त्यामुळे बळ्ळारी नाला परिसरातील शिवारातील पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.
सध्या हा नाला पूर्णपणे गाळ, जलपर्णी आणि झाडा-झुडपांनी तसेच कचऱ्यांनी बुजून गेला आहे. येळ्ळूर परिसर तसेच शिवारातून मोठ्या प्रमाणात त्या नाल्याला पाणी येते. त्याचबरोबर आता शहरातील पाणीही येळ्ळूर रस्त्यावरुन सुरू होणाऱ्या बळ्ळारी नाल्याला मोठ्या प्रमाणात येणार आहे. त्यामुळे यावर्षी तर आणखीनच गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. तेव्हा तातडीने या बळ्ळारी नाल्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. आनंदनगरपासून बळ्ळारी नाल्यापर्यंत गटारीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पाणी बळ्ळारी नाल्याला जाणार आहे. बळ्ळारी नाल्यामध्ये गाळ असल्यामुळे शिवारामध्ये पाणी शिरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे बळ्ळारी नाल्याची खोदाई केवळ येळ्ळूर रस्त्याकडूनच करून उपयोग होणार नाही तर हुदलीपासूनच त्याची खोदाई होणे गरजेचे आहे.
पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज
बळ्ळारी नाल्याला शहरातील लेंडी नाल्याचेही पाणी राष्ट्रीय महामार्गाजवळ मिळते. त्यामुळे पाण्याचा निचरा पुढे होणे कठीण झाले आहे. राष्ट्रीय महामार्गानजीक असलेले पाणी निचरा होण्याचे काँक्रिटचे बॉक्स बुजले आहेत. एकूणच या नाल्याचा पूर्णपणे सर्व्हे करून जिथे अडथळा आहे. तिथपासून खोदाई झाली तरच बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याकडे आता पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी, अनगोळ, येळ्ळूर, वडगाव, शहापूर, जुने बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे.









