शेतशिवारात सुरू झाली खरीप हंगामाची लगबग : अद्याप म्हणावा तसा जोर नसल्याने मोठ्या पावसाची प्रतीक्षाच
वार्ताहर / किणये
गेल्या बऱ्याच दिवसापासून लांबणीवर पडलेल्या पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांची शेतशिवारात खरीप हंगामाच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. शिवारात भातपेरणी, भुईमूग पेरणी व रताळी लागवड आदी कामकाजाला शेतकऱ्यांनी प्रारंभ केला आहे. यामुळे पाऊस आला आणि बळीराजा सुखावला असे चित्र सध्या तालुक्यात दिसू लागले आहे.
शनिवारपासून तालुक्यात मान्सून दाखल झाला आहे. शनिवारी तालुक्याच्या काही भागात मोठ्याप्रमाणात पाऊस झाला तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. रविवारी मात्र सर्रास भागात पावसाच्या सरी कोसळल्या. यामध्ये रविवारी सकाळी तालुक्याच्या पश्चिम भागात अधिक पाऊस झाला आहे. सध्या हवामानातही बदल झाला असून ढगाळ वातावरण कायम आहे. यामुळे दमदार पाऊस यापुढेही होणार असल्याचे संकेत शेतकऱ्यांनी वर्तविले आहेत. यामुळेच शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामातील बियाणांची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे.
रविवारी तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळगुंदी, किणये, वाघवडे, बीजगर्णी कावळेवाडी, जानेवाडी, बामणवाडी या परिसरात शेतकऱ्यांनी आपल्या शेत शिवारामध्ये रताळी वेललागवड करण्यास प्रारंभ केला आहे. मंडोळी, हंगरगा, सावगाव, बेनकनहळळी भागातील शेतकरी रविवारी सकाळी पाऊस पडल्यामुळे भातपेरणी करताना दिसत होते. काही ठिकाणी शेतकरी बैलजोडीच्या सहाय्याने व कुरीने भात फिरताना दिसून आले. तालुक्यात बासुमती, इंद्रायणी, सोना मसुरी, सोनम, माधुरा, अंतरसाळी, चिंटू, भाग्यलक्ष्मी, इंटान, दोडगा आदींसह इतर नवनवीन जातीच्या भाताची पेरणी करण्यात येऊ लागली आहे. काही शेतकऱ्यांनी गेल्या दहा-बारा दिवसापूर्वी धूळवाफ पेरणी केली होती. मात्र पावसाअभावी हे भात वाळून सुकून जाण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. अखेर पावसाने सुरुवात केली असल्यामुळे या भात पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे.
यंदा मृग नक्षत्र कोरडेच गेले. शेतशिवारातील कामे कोळंबली होती. त्यामुळे पाऊस कधी येणार याची चिंता साऱ्यांना लागून राहिली होती. अखेर आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने सुरुवात केली असल्यामुळे बळीराजासह साऱ्यांनाच दिलासा मिळाला आहे सध्यातरी नदी नाले कोरड्या अवस्थेत आहेत. नदी नाल्यांच्या प्रवाहात वाढ होण्यासाठी दमदार पाऊस होण्याची आवश्यकता आहे. पावसाने सुरुवात केल्यामुळे काही हंगामाची लगबग सुरू झाली आहे. मात्र यासाठी अजूनही दमदार पावसाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.









