ग्रामीण भागात ज्वारी, गहू, हरभरा काढण्याची लगभग ; कडबा, ज्वारीचे दर गगनाला भिडले
प्रतिनिधी/ सातारा
सातारा, वाई तालुका हा ऊस, हळद, आले व भात या बागायती पिकांचा जसा आगर मानला जातो, त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या ज्वारीच्या पिकांचे उत्पन्न घेण्यातही दोन्ही तालुक्याचे नाव अग्रेसर आहे. सध्या तालुक्यात पिकांच्या काढणीला वेग आला असून, शिवारा-शिवारात ज्वारी उदंड झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, जनावरांच्या चाऱयासाठी लागणारा कडबा व अन्य चाऱयाचा भाव गगनाला भिडला आहे. जिह्यात अवकाळी पावसाने बळीराजाचे फार मोठे नुकसान झाले असले तरीही लगेचच उघडीप मिळाल्याने रब्बी हंगामातील गहू, ज्वारीसह हरबरा, काढणीच्या कामात शेतकरी व्यस्त असून, रब्बी हंगाम अंतिम टप्यात आल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र दिसत आहे. पिकांची वाढ चांगली झाल्याने पिकाची प्रतवारी चांगली आहे. त्यामुळे यावर्षी उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाने गहू, ज्वारी भिजली असल्याने काळी पडणे, अथवा रंगाला चकाकी मिळण्याची शक्यता कमी आहे. रोजगारांचा तुटवडा भासत असल्याने मोठय़ा मशिनच्या सहाय्याने गहू काढला जात आहे. तर ज्वारी रोजंदारीवर किंवा खंडाने काढण्यास देण्यात येते. जनावरांच्या चाऱयाचा भाव गगनाला भिडला आहे. त्यातूनही शेतकऱयाला आर्थिक फायदा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. उन्हाळी कांद्याने जरी वांदे केले असले तरीही गुहू, ज्वारी हातभार लावेल यात शंका नाही.
काही दिवसांपूर्वी सातारा जिह्यात अनेक ठिकाणी अवकाळीने हजेरी लावल्याने बळीराजा चिंताग्रस्त होता. परंतु, अस्मानी संकटातून तो सावरला असून ज्वारीसह, गहू, हरबरा यांची प्रतवारी चांगली असल्याने शेतकऱयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने अचानक आलेल्या पावसामुळे रब्बी हंगाम पदरात पडतो कि नाही याची शंका निर्माण झाली होती. परंतु वाई, सातारा तालुक्यात अवकाळीने फटका दिला असला तरीही बळीराजा समाधानी आहे. चांगली थंडी पडल्याने गहू व ज्वारीच्या पिकाला पोषक वातावरण होते. लहरी निसर्गाचा फटका बसला तरीही रब्बीतील सर्वच पिके चांगली असल्याने शेतकयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तालुक्यातील बळीराजा रब्बी हंगाम यशस्वीतेसाठी कंबर कसलेला दिसत असून शेतातील कामात व्यस्त आहे.
सध्या ज्वारीचा भावसुद्धा चांगला असून, इतर पिकांच्या बाबतीत योग्य भाव मिळावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व प्रकारचे बंधारे, तलाव, बलकवडी, नागेवाडी व धोम धरणात पाण्याचा पुरेसा साठा असल्याने कालव्यातून पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शेतामध्ये गहू, हरबरा, ज्वारी, मोठय़ा प्रमाणात केली जाते. तालुक्यातील 70 टक्के क्षेत्रावर गहू, ज्वारी व हरब्रयाची पेरणी करण्यात आली आहे.
शेतकरी रब्बीच्या हंगामात व्यस्त
सातारा, वाई या दोन्ही तालुक्याचे अर्थकारण हे ऊस, हळद, आले या पिकांवर अवलंबून असले तरीही या सुद्धा पिकांचा त्यात मोलाचा वाटा आहे. सध्या निसर्गाचा लहरीपणा हा नेहमीच शेतकऱयांना अडचणीत आणत असल्याचे अनेक वर्षांपासून सिद्ध झाले आहे. सध्या रोजंदारी महाग असली तरीही तालुक्यातील काही भागात पैरा करण्यावर भर असल्याने रोजगारांचा तुटवडा जाणवत नाही. कोरोनाचा जोर ओसरला असला तरीही पूर्णपणे गेलेला नाही. एकंदरीत संपूर्ण वाई तालुक्यातील शेतकरी शेतात रब्बीचा हंगाम काढणीच्या कामात व्यस्त आहे.









