वाघवडेत श्रमदानातून तब्बल 18 फूट रुंदीचा रस्ता : इतर शेतकऱयांसमोर ठेवला आदर्श : शेतकऱयांचे आर्थिक नुकसान टळणार
वार्ताहर /किणये
सध्या बेळगाव तालुक्मयात शेत-शिवारातील रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही गावांमध्ये शेत-शिवारातील रस्त्यांवर अतिक्रमण झालेले निदर्शनास येत आहे. यामुळे शेतकऱयांना बैलगाडी घेऊन जाणेही अवघड बनले आहे. अशी परिस्थिती असताना वाघवडे गावातील शेतकऱयांनी मात्र गावच्या शिवारातील रस्त्यासाठी एकजुटीने श्रमदानातून तब्बल 18 फूट रुंदीचा रस्ता केला. यामुळे या गावातील शेतकऱयांनी तालुक्मयातील शेतकऱयांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
वाघवडे येथील पाटे शिवारात वाहतुकीसाठी रस्त्याची सोय नसल्याने शेतकऱयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. पावसाळय़ात शिवारातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण व्हायचे. त्यामुळे शेतकऱयांना पायी ये-जा करणेसुद्धा अवघड बनले होते.
पावसाळय़ात जनावरांना ओला चारा आणणेसुद्धा शेतकऱयांना कठीण बनले होते. सदर भागात उसाचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात आहे. वाघवडे गावात मोठय़ा प्रमाणात उसाचे उत्पादन घेण्यात येते. रस्त्यावर ऊस पिकाची तोडणी, वाहतूक तसेच इतर पिकांची काढणी करण्यासाठी जानेवारी, फेब्रुवारी महिन्याची वाट पाहावी लागत असल्याने शेतकऱयांचे आर्थिक नुकसान होत होते. यामुळेच गावातील एपीएमसी माजी सदस्य आर. के. पाटील व इतर शेतकरी एकत्र आले आणि आपल्या शेत-शिवारातील रस्ता आम्हीच श्रमदानाने करू, असा ठाम निर्णय
त्यांनी घेतला.
विश्वासपूर्वक श्रमदानाचा आदर्श
दोन किलोमीटर लांबीचा रस्ता श्रमदानाने करण्यासाठी सर्व शेतकऱयांना विश्वासात घेऊन अठरा फूट रुंदीच्या रस्त्याचे आरेखन करून जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याचे सपाटीकरण करण्यात आले. आवश्यक ठिकाणी सिमेंट पाईप घालून पाणी जाण्याची सोय करण्यात आली. सुमारे 800 ब्रास हार्ड मुरुम रस्त्यावर घालण्यात आले. त्यानंतर रोलर फिरवून रस्ता मजबूत करण्यात आला.
शेतकऱयांचेही कार्य उत्कृष्ट
शेतकरी एकत्र आल्यास सरकारी कामापेक्षा ते उत्कृष्ट कार्य करू शकतात, असेच यातून निदर्शनास आले. या शिवारातील रस्ता केला असल्यामुळे महिला तसेच शेतकऱयांना अधिक सोयीचे झाले आहे. तालुक्मयाच्या अनेक गावांतील शेत-शिवाराकडे जाणाऱया रस्त्यांची सध्या दुरवस्था झाली आहे. वाघवडेतील शेतकऱयांचे अनुकरण इतर गावांतून करण्याची गरज आहे.
या रस्त्याच्या कामासाठी आर. के. पाटील यांच्यासह जोतिबा आंबोळकर, संतोष आंबोळकर, बबन शहापूरकर, कल्लाप्पा पाटील, उदय पाटील, कुंदन आंबोळकर, गंगाधर केनूरकर, बाळू पाटील, पी. के. पाटील, के. के. कोवाडकर, मारुती पाटील, राहुल आंबोळकर, चांगाप्पा धामणेकर, परशराम कणबरकर, अरुण पाटील आदींसह शेतकऱयांनी विशेष परिश्रम घेतले.









