16 जूनपासून मान्सून सक्रीय होणार : पंचांगकर्त्यांचा अंदाज
प्रतिनिधी/ बेळगाव
माणसाला सतत नावीन्याची ओढ असते. तशीच ती नववर्षाची असते. गुढी पाडवा म्हणजे हिंदू नववर्षारंभ. वर्ष कसे जाईल, याची उत्सुकता थोड्या फार अंशाने भविष्य वाचून पूर्ण होते. परंतु आपल्या कृषी आणि अर्थ संस्कृतीचा कणा असलेल्या बळीराजाला मात्र उत्सुकता असते ती पर्जन्यमानाची. पर्जन्यचक्रावरती त्याचे वर्षभराचे शेतीचे नियोजन अवलंबून असते.
पाडव्याचा मुहूर्त साधून नवीन पंचांग प्रकाशित होते. यामध्ये सर्वात प्रसिद्ध असे दाते पंचांगाने 110 वर्षे पूर्ण केली. आजही घरोघरी पंचांग खरेदी केले जाते. गुढी पाडव्या दिवशी पंचांगाचे वाचन करण्याची प्रथा आहे. सध्या बाजारपेठेत दाते पंचांगाबरोबरच ‘कालनिर्णय-मोठे पंचांग’, ‘कोल्हापूर लाटकर पंचांग’ व रुईकर पंचांग’ आले आहेत. मराठी बरोबरच विविध भाषांमध्ये सुद्धा पंचांग येत आहे. त्यामुळे आजच्या वैज्ञानिक युगातसुद्धा पंचांग आपले महत्त्व राखून आहेत. बळीराजासाठी यंदाचे पर्जन्यमान असे असणार आहे.
हवामान व पर्जन्य विचार
शके 1947 चैत्र शु. 1 रविवार दि. 30 मार्च 2025 रोजी नूतन विश्वावसु संवत्सर सुरू होत आहे. वर्षप्रवेश कुंडलीत सिंह लग्न उदित असून अग्निमंडल योग होत आहे. मागील वर्षात 24 मार्च 2025 रोजी झालेल्या रवि, बुध युतीमुळे मार्च-एप्रिलमध्ये उष्णता मानात वाढ होईल. 7 एप्रिलची शुक्र, शनि युती आणि पुन्हा 24 एप्रिलची शुक्र, शनि युतीमुळे मे महिन्यात संमिश्र तापमान राहील. तापमानात चढ-उतार जाणवेल. 30 मे च्या ऋतुउत्तेजक रवि, बुध युतीचा परिणाम पाहता केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन 4 जूनपर्यंत होईल असे वाटते. 16 जूनपासून महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होईल.
एकंदरीत आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, हस्त या नक्षत्रांचा पाऊस बऱ्यापैकी होईल. 16 जून ते 15 जुलै आणि 2 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीत मोठी पर्जन्यवृष्टी होईल. त्यानंतर 20 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात पावसाचे योग आहेत. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी पर्जन्यमान कमी असेल. काही प्रदेशात दुष्काळ सदृश परिस्थिती राहील. (हा पर्जन्य विचार लिहिण्याचे कामी ज्यो. सिद्धेश्वर मारटकर पुणे यांचे सहकार्य लाभले आहे.)
नक्षत्रानुसार पर्जन्य विचार
मृग नक्षत्र- दि. 8 जून 2025 रोजी रविवारी सकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी सूर्याचे मृग नक्षत्र सुरू होत आहे. त्यावेळी मिथुन लग्न असून वरुण मंडल योग होत आहे. या नक्षत्राचे वाहन कोल्हा असून मंगळ अमृत नाडीत आहे. 30 मेची रवि, बुध युती ही ऋतुउत्तेजक असल्याने उन्हाळा चांगला जाणवेल आणि पाऊस मध्यम मानाने होईल. 8 जूनच्या बुध, गुरु युतीमुळे मेघगर्जनेसह पाऊस होईल. मात्र या नक्षत्राचा पाऊस हुलकावण्या देईल आणि सर्वत्र होईल असे वाटत नाही. पण 16 जूनपासून मान्सून महाराष्ट्रात सक्रीय होऊ लागेल. जून 14 ते 18 पाऊस अपेक्षित आहे.
आर्द्रा नक्षत्र- दि. 22 जून 2025 रोजी रविवारी सकाळी 6.19 वा. सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. प्रवेश वेळी मिथुन लग्न उदित वरुण मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन उंदीर आहे आणि मंगळ, बुध हे जलनाडीत आहेत. 24 जूनची रवि, गुरु युती पर्जन्य पोषक असून या नक्षत्राच्या उत्तरार्धात पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी असेल. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होईल. जून 27 ते 30, जुलै 1, 2 पाऊस अपेक्षित.
पुनर्वसु नक्षत्र- दि. 5 जुलै 2025 रोजी उत्तररात्री 29.47 वाजता (म्हणजे 6 जुलै रविवारी पहाटे 5:47 वाजता) सूर्य पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करीत आहे. त्यावेळेस मिथुन लग्न असून वरुण मंडल योग होत आहे. या नक्षत्राचे वाहन घोडा असून मंगळ, बुध हे जलनाडीत आहेत. 4 जुलैच्या शुक्र, हर्षल युतीचा विचार करता या नक्षत्राचा पाऊस मध्यम मानाने होईल. काही ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल. जुलै 10 ते 15 पाऊस अपेक्षित.
पुष्य नक्षत्र- दि. 19 जुलै 2025 रोजी उत्तररात्री 29.22 वाजता (म्हणजे 20 जुलै, रविवारी पहाटे 5:22 वाजता) पुष्य नक्षत्रामध्ये सूर्य प्रवेश करीत आहे. प्रवेश वेळी मिथुन लग्न उदित असून वायूमंडल योग आहे. पर्जन्यसूचक मोर हे वाहन आहे आणि रवि, मंगळ, बुध हे जलनाडीत आहेत. या नक्षत्रात पाऊस बऱ्यापैकी होईल. उत्तरार्धात पावसाचा जोर वाढेल. जुलै 24 ते 28 पाऊस अपेक्षित.
अश्लेषा नक्षत्र- दि. 2 ऑगस्ट 2025 रोजी उत्तररात्री 28:08 वाजता (म्हणजे 3 ऑगस्ट, रविवारी पहाटे 4:08 वाजता) सूर्य आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करतो. प्रवेशवेळी मिथुन लग्न आणि वरुणमंडल योग आहे. या नक्षत्राचे गाढव हे वाहन असून रवि, मंगळ, बुध हे जलनाडीत आहेत. 31 जुलैची ऋतुउत्तेजक रवि, बुध युती, 9 ऑगस्टची मंगळ, शनि प्रतियुती आणि 12 ऑगस्टच्या गुरु, शुक्र युतीचा विचार करता या नक्षत्राचा पाऊस अतिवृष्टी करून नुकसान करणारा होईल. नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागेल. ऑगस्ट 7 ते 14.
मघा नक्षत्र- दि. 16 ऑगस्ट 2025 रोजी शनिवारी उत्तररात्री 25:52 वाजता सूर्याचे मघा नक्षत्र सुरू होत आहे. त्यावेळी वृषभ लग्न असून वायूमंडल योग आहे. पर्जन्य सूचक बेडूक हे वाहन आहे आणि रवि, बुध, गुरु, शुक्र हे जलनाडीत आहेत. 12 ऑगस्टच्या गुरु, शुक्र युतीचा परिणाम म्हणून या नक्षत्रात पर्जन्यमान मध्यम राहील. काही भागात पाऊस ओढ धरेल. ऑगस्ट 20 ते 24 पाऊस अपेक्षित.
पूर्वा नक्षत्र-दि. 30 ऑगस्ट 2025 रोजी शनिवारी रात्री 9 वा. 44 मि. नी सूर्य पूर्वा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. प्रवेश वेळी मेष लग्न उदित असून वायूमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन पर्जन्यसूचक म्हैस आहे. रवि, बुध, गुरु, शुक्र हे जलनाडीत आहेत. या नक्षत्राचा पाऊस दक्षिण महाराष्ट्रात चांगला होईल. काही प्रदेशात पावसाचा मोठा खंड पडेल. सप्टें. 4 ते 8 पाऊस अपेक्षित.
उत्तरा नक्षत्र- दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी शनिवारी 15:41 वाजता सूर्याचे उत्तरा नक्षत्र सुरू होत आहे. त्यावेळेस मकर लग्न आणि इंद्र मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन कोल्हा असून रवि, बुध, गुरु, शुक्र हे जलनाडीत आहेत. 13 सप्टेंबरच्या रवि, बुध युतीमुळे नक्षत्राच्या सुरुवातीला पाऊस चांगला होईल. पण नंतर पाऊस ओढ धरेल. सप्टेंबर 16 ते 21 पाऊस अपेक्षित.
हस्त नक्षत्र- दि. 27 सप्टेंबर 2025 रोजी शनिवारी सकाळी 7 वाजून 07 मिनिटांनी सूर्याचे हस्त नक्षत्र सुरू होत आहे. त्यावेळी कन्या लग्न उदित आहे आणि वायुमंडल योग होत आहे. पर्जन्यसूचक मोर हे वाहन असून रवि, गुरु, शुक्र हे जलनाडीत आहेत. मेघगर्जना युक्त पाऊस होईल. पण पर्जन्यमान मध्यम राहील. मात्र काही भागात पाऊस बऱ्यापैकी होईल. तर काही भागात पाऊस ओढ धरेल. उष्णतामान वाढेल. सप्टें. 29, 30, ऑक्टो. 3, 4, 5 पाऊस अपेक्षित.
चित्रा नक्षत्र- दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी शुक्रवारी 20:12 वाजता सूर्य चित्रा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. प्रवेश वेळी मेष लग्न आणि अग्नि मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन पर्जन्यसूचक हत्ती असून गुरु, शुक्र, शनि हे जलनाडीत आहेत. 11 ऑक्टोबरची शुक्र शनि प्रतियुती, 20 ऑक्टोबरची मंगळ, बुध युती यांचा विचार करता अल्पवृष्टीचे योग दिसतात. खंडित वृष्टी होईल. पाऊस ओढ धरेल. उष्णतामान वाढेल. ऑक्टो. 13 ते 16 पाऊस अपेक्षित.
स्वाती नक्षत्र- दि. 24 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6:40 वाजता सूर्य स्वाती नक्षत्रात प्रवेश करीत आहे. प्रवेश वेळी तुला लग्न असून वायूमंडल योग आहे. गुरु, शनि हे जलनाडीत आहेत. पर्जन्य सूचक बेडूक हे वाहन आहे. मात्र या नक्षत्रात फारसा पाऊस अपेक्षित नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे योग आहेत. ऑक्टो. 30, 31, नोव्हें. 2, 3, 4 पाऊस अपेक्षित.
कालनिर्णय
या पंचांगानुसार यावर्षी विश्वावसुनाम संवत्सरात पाऊस थोडा पडेल. 22 जून 2025 रोजी सकाळी 6.19 ला सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करेल. त्याचे कल लोकांमध्ये सुखसमाधान वाढेल. निलक नावाचा मेघ असल्याने पाऊस चांगला पडून धन, धान्य मुबलक होईल. लोक आनंदी राहतील. यावर्षी वासुकी नावाचा नाग असल्याने पर्जन्यमान चांगले राहिल. पिके चांगल्या प्रकारे येतील. यावर्षी दोन आढक म्हणजे पर्जन्यमान साधारण असून त्यापैकी सहा भाग नद्या व पर्वत यावर आणि चार भाग पृथ्वीवर पर्जन्य होईल.
याशिवाय रुईकर पंचांगाने पावसाचे प्रमाण लहरीपणाचे राहिल. जेथे पडेल तेथे ओल्या दुष्काळाची भीती वर्तविली आहे. पावसासंबंधीचे भविष्य प्रमाणबद्ध जमणे प्रयासाचे असून वातावरणातील बदलांमुळे नेमका पाऊस अमुक गावी पडेलच असे सांगणे कठीण असल्याचे स्पष्ट केले आहे.
लाटकर पंचांगाने नूतन वर्षी सहावेळा पर्जन्य स्तंभ योग असून पर्जन्यनाचे मान समाधानकारक राहिल. पावसाला विलंबाने सुरुवात होईल. जूनमध्ये ढगाळलेले वातावरण असेल आणि जूनच्या मध्यानंतरच पावसाला प्रारंभ होईल व शेवटच्या आठवड्यात खऱ्या अर्थाने पाऊस पडेल. मधल्या नक्षत्रांचा पाऊस समाधानकारक आहे. जलसाठे पूर्ण क्षमतेने भरले तरी काही ठिकाणी पाऊस कमी राहिल, अशी शक्यता वर्तविली आहे.









