अनुदानाचा अभाव : पारंपरिक साधनांचाच वापर : शासन लक्ष देणार का?
बेळगाव : शेतकऱ्यांना यंत्रोपकरणासाठी मिळणारे अनुदान थांबल्याने आधुनिक उपकरणांपासून वंचित राहावे लागत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि कृषी विस्तारांतर्गत शेतकऱ्यांना उपकरणांसाठी अनुदान उपलब्ध होते. मात्र, गतवर्षीपासून या अनुदानाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. कृषी उत्पादन वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. विशेषत: आधुनिक यंत्रांचा वापर करून उत्पादनात भर पाडण्यासाठी खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र नवीन उपकरणे मिळवून देणाऱ्या योजनेकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांना पारंपरिक उपकरणांवरच विसंबून राहावे लागत आहे. अलीकडे शेतीत आधुनिक यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. विशेषत: टॅक्टर, पॉवर टिलर, कोळपणी, मळणी यंत्र आदींचा वापर होऊ लागला आहे. या यांत्रिकीकरणासाठी कृषी खात्याकडून अनुदान उपलब्ध होईनासे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानांतर्गत यंत्रे दिली जातात. मात्र, या योजनेसाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे योजना बारगळली आहे.
जिल्ह्यात 39 हून अधिक रयत संपर्क केंद्रे आहेत. शिवाय कृषी पत्तीन संघ आणि इतर तात्पुरती कृषी केंद्रेदेखील स्थापन करण्यात आली आहेत. या माध्यमातून बी-बियाणे, कीटकनाशके आणि खताचे वितरण होऊ लागले आहे. मात्र, कृषी खात्याला यंत्रासाठी अनुदान उपलब्ध होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी खात्याच्या पायऱ्या विनाकारण झिजवाव्या लागत आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत 50 टक्के सवलतीच्या दरात शेतीची यंत्रे दिली जातात. मात्र, मागील वर्षीपासून निधीची चणचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंत्रे मिळेनाशी झाली आहेत. शेतीकामात मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशा परिस्थितीत आधुनिक यंत्रे आधार ठरतात. मशागत, पेरणी, कोळपणी आदी कामात यंत्रांचा वापर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांची कष्ट आणि वेळेची बचत होते. मात्र, शासन अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार का? हे पाहावे लागणार आहे.
कृषी खात्याने लक्ष द्यावे
पॉवर टिलरसाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र, गतवर्षीपासून अनुदान उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे यंदादेखील भात लागवड पारंपरिक पद्धतीनेच केली आहे. नवीन यंत्र सामग्रीसाठी कृषी खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
-कल्लाप्पा पाटील, शेतकरी
शासनाकडे अनुदानासाठी पाठपुरावा
कृषी यंत्रासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, शासनाकडून अनुदान उपलब्ध झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना यंत्रे मिळाली नाहीत. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. अनुदान उपलब्ध झाल्यानंतर यंत्रे दिली जाणार आहेत.
-शिवनगौडा पाटील, सहसंचालक, कृषी खाते









