प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur Crime News : बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्सवर टाकलेल्या सशस्त्र दरोडा प्रकरणातील मुख्य सुत्रधारास कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केले.इंदोर येथे शुक्रवार, 1 सप्टेंबर रोजी सापळा रचून ही कारवाई केली.अंकित उर्फ छोटु श्रीनिवास शर्मा (वय 23, रा. पुठ रोड, अम्बाह जि. मुरैना मध्यप्रदेश) असे त्याचे नाव आहे.त्याच्याकडून पोलिसांनी 15 तोळे सोने,4 मोबाईल,एक मोटार,1 वायफाय डोंगल,2 पिस्टल, 7 जिवंत काडतूसे असा सुमारे 16लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.त्याला न्यायालयाने 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत अधिक माहिती अशी,बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्समध्ये 8 जून 2023 रोजी दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. अंधाधुंद गोळीबार करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. फिर्यादी रमेश शंकरजी माळी, त्यांचा मेहुणा जितेंद्र माळी यांना मारहाण करुन रमेश माळी यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांनी दुकानातील रोख दीड लाख रुपये व 1 कोटी 87 लाख रुपयांचे दागिने लंपास केले होते.या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणने समांतर तपास करुन सतीश उर्फ संदिप सखाराम पोहाळकर (वय 37, रा. कणेरकरनगर रिंगरोड), विशाल धनाजी वरेकर (वय- 32, रा. कोपर्डे ता. करवीर), अंबाजी शिवाजी सुळेकर (वय- 44, रा. पासार्डे ता. करवीर) या तिघांना जेरबंद केले होते.त्यांच्याकडून 37 तोळे दागिने,एक स्विफ्ट,एक मोटारसायकल जप्त केली होती.मात्र या प्रकरणातील मुख्य संशयितासह अन्य चौघेजण पसार होते.ते मोटारीतून पुण्यापर्यंत आणि तेथून इंदोरला पसार झाल्याची माहिती मिळाली होती. मुख्य संशयित अंकित शर्मा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी इंदोर येथे येणार असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली.यानुसार एक पथक 30 ऑगस्ट रोजी इंदोरकडे रवाना झाले.त्यांनी मुरेना येथे सापळा रचून अंकित शर्माला ताब्यात घेतले.यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 11 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.यानंतर पुन्हा त्याला तपासासाठी इंदोर येथे नेण्यात आले.या ठिकाणी तो भाड्याने राहणाऱ्या खोलीवर छापा टाकून चोरीच्या पैश्यातून खरेदी केलेली मोटार,4 अॅडाईड फोन,वायफाय डोंगल,साधा मोबाईल,2 सिमकार्ड,15 तोळे दागिने,2 पिस्टल,7 जिवंत काडतूस असा सुमारे 6 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई,पोलीस निरीक्षक तानाजी सावंत,पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ,पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे,पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी,संजय हुंबे,संजय कुंभार,विलास किरोळकर,सागर चौगले,सुरेश पाटील,विनोद कांबळे,राजेंद्र वरंडेकर यांनी ही कारवाई केली.
पहिल्या तिघांचे दोषारोपपत्र दाखल, आणखी तीघांचा शोध सुरु
या प्रकरणातील तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने जेरबंद केले.त्यांच्याविरोधात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.या घटनेत एकूण 7 जणांचा समावेश असून आत्तापर्यंत चौघांना जेरबंद केले आहे.अद्याप तिघांचा शोध सुरु आहे.हे तिघेही मध्यप्रदेश येथील असून कामानुसार ते वेगवेगळ्या टोळ्यांचा आसरा घेतात.
23 वर्षाच्या शर्मावर 15 गुन्हे
दरोडा प्रकरणातील मुख्य संशयित अंकितचे वय केवळ 23 आहे.तो मध्यप्रदेश हरियाण येथील कुख्यात गुंड असून त्याच्यावर आत्तापर्यंत 15 गंभीर गुन्हे दाखल आहेत. इंदोर येथील आंबाह येथे 12, कोळसा येथे 1, कोतवाली येथे 1 तर कोल्हापुरात 1 गुन्हा दाखल आहे.
पुण्यात वाटण्या
दरोड्याच्या घटनेनंतर मध्यप्रदेशातील 4 आरोपी मोटारीतून पुणे येथे गेले.जात असतानाच त्यांनी लुटलेल्या मुद्देमालाच्या 7 वाटण्या केल्या.यानंतर हे सर्वजण पसार झाले. लुटलेला माल घेवून हे 4 ही आरोपी मध्यप्रदेशातील विविध ठिकाणी आश्रयाला गेले.









