कोल्हापूर पोलिसांची मध्यप्रदेश येथील मुरैना येथे कारवाई, 15 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी
कोल्हापूर प्रतिनिधी
बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्सवर टाकलेल्या सशस्त्र दरोडा प्रकरणातील मुख्य सुत्रधारास कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केले. मध्यप्रदेश येथील मुरैना येथे कारवाई करुन कोल्हापूर पोलिसांनी भुपेंद्र उर्फ राणा उर्फ पवन शर्मा (वय 32 रा. मुरैना, जि. मुरैना, मध्यप्रदेश) याला अटक केली. 8 जून 2023 रोजी कात्यायनी ज्वेलर्स येथे दरोडा टाकून तो पसार झाला होता. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 15 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी, बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्समध्ये 8 जून 2023 रोजी दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. अंधाधुंद गोळीबार करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. फिर्यादी रमेश शंकरजी माळी, त्यांचा मेहुणा जितेंद्र माळी यांना मारहाण करुन रमेश माळी यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांनी दुकानातील रोख दीड लाख रुपये व 1 कोटी 87 लाख रुपयांचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणने समांतर तपास करुन सतीश उर्फ संदिप सखाराम पोहाळकर (वय 37, रा. कणेरकरनगर रिंगरोड), विशाल धनाजी वरेकर (वय 32, रा. कोपर्डे ता. करवीर), अंबाजी शिवाजी सुळेकर (वय 44, रा. पासार्डे ता. करवीर) या तिघांना जेरबंद केले होते. त्यांच्याकडून 37 तोळे दागिने, एक स्विफ्ट, एक मोटारसायकल जप्त केली होती. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार पसार होते. 1 सप्टेंबर रोजी सापळा रचून कोल्हापूर पोलिसांनी मध्यप्रदेश येथून अंकित उर्फ छोटु श्रीनिवास शर्मा (वय 23, रा. पुठ रोड, अम्बाह जि. मुरैना मध्यप्रदेश) याच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्याच्याकडून पोलिसांनी 15 तोळे सोने, 4 मोबाईल, एक मोटार, 1 वायफाय डोंगल, 2 पिस्टल, 7 जिवंत काडतूसे असा सुमारे 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या घटनेत गोळीबार करणारा मुख्य भुपेंद्र शर्मा अद्यापही पोलिसांना चकवा देवून पसार होता. आठ दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिसांना भूपेंद्र शर्मा मुरैना येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळाली होती. यानुसार कोल्हापूर पोलिसांचे एक पथक मध्यप्रदेशला रवाना झाले होते. या पथकाने मुरैना येथून भुपेंद्र शर्मा याच्या मुसक्या आवळल्या. गेल्या 8 महिन्यांपासून भुपेंद्र शर्मा पोलिसांना गुंगारा देवून पसार झाला होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, प्पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, संजय कुंभार, विनोद कांबळे, राजेंद्र वरंडेकर यांनी ही कारवाई केली.
सहा जणांचा समावेश
या प्रकरणातील चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने जेरबंद केले. त्यांच्याविरोधात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र यापूर्वीच दाखल केले आहे. या घटनेत एकूण 6 जणांचा समावेश असून आत्तापर्यंत पाच जणांना जेरबंद केले आहे.
कोल्हापूर पोलिसांकडून दुसऱ्यांदा अटक
2016 मध्ये आजरा येथील एका ज्वेलर्स दुकानात भुपेंद्र शर्मा याने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही भुपेंद्र शर्मा याने गोळीबार करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा दरोड्याचा हा प्रयत्न फसला होता. नागरीकांनी त्याचा पाठलाग करुन पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.