प्रतिनिधी,कोल्हापूर
बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्सवरील सशस्त्र दरोड्यातील मुख्य सूत्रधार विशाल धनाजी वरेकर आणि सतीश सखाराम पोहाळकरला रविवारी न्यायालयाने 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्सवर 8 जून रोजी पडलेल्या दरोड्याचा कोल्हापूर पोलिसांनी 36 तासात छडा लावला. हा गुन्हा उघडकीस आणून रेकॉर्डवरील विशाल वरेकर आणि सतीश पोहाळकर यांना अटक करुन 30 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. या गुन्ह्यात एकूण सातजणांचा सहभाग असल्याचे तपासात पुढे आले. त्यापैकी चौघे परराज्यातील असून एक संशयित कोपार्डेतील असल्याची चर्चा आहे.
त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके मागावर आहेत. त्यांना अटक केल्यावरच अन्य मुद्देमाल हस्तगत होणार आहे. अटक केलेल्या वरेकर आणि पोहाळकर या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह करवीर पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत.









