संत मीरा संघांना तिहेरी मुकुट
बेळगाव : येथील सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित प्राथमिक व माध्यमिक आंतरशालेय मुला-मुलींच्या तालुकास्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेने तिहेरी मुकुट संपादन केला. तर बालिका आदर्श शाळेनेही प्राथमिक मुलींचे विजेतेपद पटकाविले. संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर प्राथमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने सेंट झेवियर्स शाळेचा टायब्रेकरमध्ये 3-2 असा पराभव केला. विजयी संघाच्या निरंजन घाडी, श्रेयस किल्लेकर, मनीष शेट्टी यांनी प्रत्येकी एक गोल केले. मुलींच्या गटातील अंतिम लढतीत बालिका आदर्श शाळेने सेंट झेवियर्स शाळेचा 3-1 असा पराभव केला. विजयी संघाच्या शिवानीने तीन गोल केले. माध्यमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने सेंट झेवियर्स शाळेचा 5-2 असा पराभव केला. विजयी संघाच्या अभिषेक गिरीगौडरने 2 गोल तर लिंगेश नाईक ,प्रथमेश शहापूरकर, प्रणव यांनी प्रत्येकी 1 गोल केले.
तर मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने कॅन्टोन्मेंट शाळेचा 1-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. विजयी संघाची कर्णधार समीक्षा बुद्रुकने 1 गोल केला. वरील विजेते 4 संघ डिवाईन मर्सी मच्छे येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे बेळगाव जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर. पी. वंटगुडी, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील, कॅम्प माध्यमिक विभाग संघटनेचे अध्यक्ष नागराज भगवंतण्णावर, एच. व्ही. रोगी यांच्या हस्ते विजेत्या संघाला प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविले. याप्रसंगी क्रीडाशिक्षक देवेंद्र कुडची, मयुरी पिंगट, सचिन कुडची, ज्युलेट फर्नांडिस, साकीब बेपारी, मानस नायक, चंद्रकांत तुर्केवाडी, उमेश मजुकर, यश पाटील, शिवकुमार सुतार, जयसिंग धनाजी, बापूसाहेब देसाई, प्रकाश बजंत्री, चेस्टर रोझारियो, आदी मान्यवर उपस्थित होते.









