बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व गोमटेश विद्यापीठ मजगाव आयोजित टिळकवाडी विभागीय माध्यमिक कब्बडी स्पर्धेत मुलांमध्ये गोमटेश विद्यापीठ-हिंदवाडीने एसकेई मराठी संघाचा तर मुलींच्या विभागात बालिका आदर्शने गोमटेश विद्यापीठ हिंदवाडीचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. एसकेई मराठी व कन्नडा स्कूलच्या मैदानावरती कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या गटात 12 संघांचा तर मुलींच्या गटात 10 संघांचा समावेश होता. मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात एसकेई मराठीने ठळकवाडी संघाचा 25-12 अशा गुणांनी पराभव करून तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात गोमटेश विद्यापीठने एम. व्ही. हेरवाडकर संघाचा 18-7 अशा गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात गोमटेश विद्यापीठ हिंदवाडी संघाने एसकेई मराठी संघाचा 29-14 असा पराभव केला.
मुलींच्या गटात पहिल्या उपांत्य सामन्यात गोमटेश विद्यापीठ हिंदवाडीने ठळकवाडी संघाचा 14-7 अशा गुणफरकाने तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात बालिका आदर्शने एसकेई कन्नडा संघाचा 17-4 अशा गुणफरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात बालिका आदर्शने गोमटेश हिंदवाडीचा 15-7 अशा गुणफरकाने पराभव करीत अजिंक्यपद मिळविले. या सामन्यानंतर गोमटेश विद्यापीठ मजगाव संघाचे मुख्याध्यापक महांतेश हिरेमठ, गायत्री शिंदे, सावित्री नाईक, सदाशिव वैजनाथमठ, प्रदीप पाटील, विवेक पाटील, सुनील पाटील आदींच्या हस्ते विजेत्या बालिका आदर्श व गोमटेश विद्यापीठ संघाला तर उपविजेत्या एसकेई मराठी व गोमटेश विद्यापीठ हिंदवाडी संघाना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून उमेश बेळगुंदकर, उमेश मजूकर, एस. आर. पाटील, प्रविण पाटील, रामलिंग परीट, अर्जुन भेकणे, बी. एस. सॉलोमन, शिवकुमार कनद, एस. बी. पाटील, अनिल जनगौडा, अशोक मुन्नोळी यांनी काम पाहिले.









