आतापासूनच किल्ल्यांच्या तयारीला वेग : नावीन्यपूर्ण किल्ले तयार करण्याकडे तरुणाईचे लक्ष
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यास बालचमूंनी सुरुवात केली आहे. शहरासह तालुक्यात मातीचे किल्ले बांधण्यास प्रारंभ झाला असून सायंकाळच्या वेळी हे काम सुरू आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर किल्ले तयार केले जातात. त्यामुळे आतापासूनच किल्ल्यांच्या तयारीला वेग आला आहे. शिवरायांचा अभिमान बाळगावा तर तो बेळगावकरांनीच, असे अभिमानाने म्हटले जाते. दिवाळीच्या कालावधीत युवक तसेच बालचमूंकडून भव्यदिव्य किल्ले तयार केले जातात. दरवर्षी दिवाळीच्या अगोदर काही दिवस किल्ले तयार करण्यास सुरुवात होते. खुल्या जागांमध्ये हे किल्ले उभारले जातात. यासाठी किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती, त्यांचे नकाशे जमा करून माहिती मिळवली जाते. माती, सिमेंट तसेच इतर साहित्याचा वापर करून किल्ले उभारले जातात. बेळगावमध्ये जुने बेळगाव, अनगोळ, वडगाव तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात भव्यदिव्य किल्ले उभारले जातात. याचबरोबर ग्रामीण भागातील तुरमुरी, आंबेवाडी भागातही मागील काही वर्षांपासून शिवकालीन किल्ले उभारले जात आहेत. दिवसभर शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन सायंकाळी फावल्या वेळेत किल्ल्यांची उभारणी केली जाते. यासाठी येणारा खर्चही मोठा असून वर्गणीतून तो भागवला जातो.
स्पर्धांमुळे वाढली चुरस
किल्ल्यांमधून बालचमूंना जाज्वल्य इतिहास समजावा यासाठी बेळगावमधील विविध संघटना किल्ला स्पर्धा आयोजित करतात. किल्ला स्पर्धांमुळे तरुणाईंमध्ये चुरस वाढली असून नावीन्यपूर्ण किल्ले तयार करण्याकडे तरुणाईचे लक्ष आहे. त्यामुळे दरवर्षी एखादा वेगळा किल्ला निवडून स्पर्धेसाठी तयारी केली जाते.
मातीचे मावळेही बाजारात दाखल
किल्ल्यांवर ठेवण्यासाठी मातीचे मावळेही विक्रीसाठी दाखल झाले आहेत. शस्त्रधारी मावळे, बैलगाड्या, छ. शिवाजी महाराजांची मूर्ती, लहान किल्ले विक्री केले जात आहेत. 40 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत हे साहित्य विक्री केले जात आहे. मावळे खरेदी करण्यासाठी लहान मुलांची बाजारात झुंबड उडत आहे.









