भीषण अपघाताला 51 दिवस पूर्ण : नातलगांचे डीएनए नमुने जुळवण्यासाठी प्रयत्न
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ओडिशातील बालासोर जिह्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अनेकांचे मृतदेह आजही ऊग्णालयात आपल्या प्रियजनांच्या प्रतीक्षेत आहेत. बालासोर रेल्वे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचे 40 ते 41 मृतदेह अद्यापही जतन करून ठेवण्यात आले आहेत. डीएनए नमुने जुळल्यानंतरच मृतदेह नातलगांच्या ताब्यात देत आहोत, अशी माहिती शनिवार 22 जुलै रोजी एम्स भुवनेश्वर, ओडिशाचे संचालक डॉ. प्राध्यापक आशुतोष बिस्वास यांनी दिली.
ओडिशात जून महिन्यात झालेल्या या भीषण रेल्वे अपघातात 293 हून अधिक मृत्यू आणि 1000 हून अधिक लोक जखमी झाले होते. हा अपघात गेल्या दोन दशकांतील भारतातील सर्वात मोठा रेल्वे अपघात होता. रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारीच रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अहवालातील कारणांचे तपशीलवार निष्कर्ष प्रसिद्ध करताना सिग्नल यंत्रणेतील त्रुटीमुळे अपघात झाल्याचे स्पष्टीकरण दिले होते. या महिन्याच्या सुऊवातीला केंद्रीय अन्वेषण ब्युरोने या अपघातप्रकरणी भारतीय रेल्वेच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक केली होती. त्यांच्यावर निर्दोष हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांच्या सीबीआय कोठडीची मुदत 15 जुलै रोजी संपल्याने आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे.
ओडिशातील बालासोर जिह्यातील बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ 2 जून रोजी संध्याकाळी रेल्वे अपघाताची घटना घडली होती. शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस, बेंगळूर-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडी असा तिहेरी अपघात झाल्यानंतर घटनास्थळी हृदयद्रावक स्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.