ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आज पुण्यात शिंदे समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे स्वर्गातून एकनाथ शिंदे यांना आशीर्वाद देत आहेत, अशा स्वरुपाचे हे बॅनर आहेत. त्यामुळे या बॅनरवरुन आता पुन्हा एकदा नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
शिंदे समर्थकांनी लावलेल्या या बॅनरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वर्गातून आशीर्वाद देत असल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच प्रभू श्रीराम एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण सुपूर्द करत आहेत. बॅनरवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून गहाण असलेला धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनी सोडवला, अशा स्वरूपाचा मजकूर लिहिण्यात आला आहे.
अधिक वाचा : ठाकरे गटाने ट्विटर हँडलवरुन शिवसेनेचे नाव, धनुष्यबाण हटवले
दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. निवडणूक आयोगाने दबावाखाली निर्णय घेतल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होत आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गट आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.