बाबरी पाडली त्यावेळी शिवसैनिक तिथे नव्हते असे विधान करून बाबरी प्रकरणाशी बाळासाहेबांचा काहीही संबंध नाही असे विधान केल्यानंतर पुन्हा राजकिय वाद निर्माण झाला आहे. चंद्रकांत पाटलांच्या या विधानानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करावी नाहीतर स्वत: राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “राममंदिराचा निकाल कोर्टाने दिला आहे. चंद्रकांत पाटील बाबरीच्य़ा खंदकातून बाहेर पडले आहेत. सध्याचे पंतप्रधानही त्यावेळी हिमालयात असतील. त्यावेळीच्या भाजपाच्या अध्यक्षांनीही यात भाजपाचा संबंध नसल्याचे जाहीर केले होते. आता भाजपचे उंदीर बाहेर पडले आहेत.” असा आरोप त्यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “भारतीय जनता पक्षाकडे गोमुत्रधारी हिंदुत्व आहे. मला भाजपाची किव येत आहे. एका बाजूला मोहन भागवत मदरश्यांना भेटी देत आहेत. तर दुसरीकडे भाजप म्हणातय कि आम्ही बाबरी पाडली. यांचं हिंदुत्व शेंडी जानव्यांचं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व हे जनसामान्याचं आहे.” असा खुलासा त्यांनी यावेळी केला.
शिंदे- फडणवीस सरकारवर आरोप करताना ते म्हणाले, “आमच्याकडिल मिंद्यांनी भाजपबरोबर लाळघोटेपणा केला आहे. ज्या चंद्रकांत पाटलांनी शिवसैनिक नव्हतेच असा आरोप केला त्यांनी बाळासाहेबांचा अपमान केला. मिंदे सरकारने त्यांचा राजीनामा मागावा अन्यथा आपण राजीनामा द्यावा. ते भाजपसोबत राहणार असतील तर शिवसेना हे नाव त्यांनी सोडून द्यावं” असा घणाघात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला.
“बाबरी जेव्हा पाडली तेव्हा भाजप गप्प का होते. भाजपचे नेते आयात केलेले असून त्यांच्याकडे स्वत:चे नेर्तृत्व नाही. हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांचा अत्यंत हिडीस चेहरा लपला आहे. बाळासाहेबांच्या विचारावर चालणाऱे आता चंद्रकांत पाटलांना जोडे मारणार काय ? मुख्यमंत्र्यानी चंद्रकांत पाटलांची मंत्रिमंडळांतून हकालपट्टी करावी.”अशी मागणी त्यांनी केली.








