सरकारकडून अंतराची मर्यादा निश्चित : उच्च माध्यमिकसाठी 7 किमीपर्यंतची मुभा
पणजी : शाळकरी मुलांची वाहतूक करणारे बालरथ यापुढे केवळ पाच किमी अंतरापर्यंतच्या मुलांची ने-आण करणार आहेत. काही दिवसांपूर्वी कुंकळ्ळी येथे एका बालरथ बसला झालेल्या अपघातानंतर राज्य सरकारने सदर निर्णय घेतला आहे. एखादे हायस्कूल असलेल्या भागाच्या पाच किमी परिघातच बालरथ फिरणार आहे तर उच्च माध्यमिक विद्यालयांच्या 7 किमी परिघातील मुलांची वाहतूक करणार आहेत. यापूर्वीच्या योजनेत बालरथांना अंतराची कोणतीही मर्यादा नव्हती. त्याचा फायदा घेत अन्य शैक्षणिक संस्था असलेल्या भागातूनसुद्धा विद्यार्थ्यांना आणण्यात येत होते. अशाच प्रकारातून काही दिवसांपूर्वी कुंकळ्ळीतून बाळ्ळी येथे जाणाऱ्या एका बालरथला अपघात झाला होता. त्यात अनेक मुले जखमी झाली होती.
यापुढे या सर्व प्रकारांवर मर्यादा येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही बालरथाला निर्धारित अंतरापेक्षा लांब भागात जाता येणार नाही. तरीही तसा प्रयत्न झाल्यास व त्यादरम्यान एखादी अप्रिय घटना घडल्यास संबंधित शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापनास जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे. सरकारी अनुदानित शाळांना बालरथ बससेवा देण्यासंबंधी सुधारित योजना शुक्रवारी अधिसूचित करण्यात आली आहे. त्यानुसार हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना अनुक्रमे 5 आणि 7 किमी अंतराची मर्यादा घालून देण्यात आली आहे. तसेच सदर मर्यादा पार केल्यास आणि कोणतीही अप्रिय घटना घडल्यास व्यवस्थापनास जबाबदार धरण्यात येईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे, अशी माहिती खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या योजनेंतर्गत बसचालकास मासिक 17 हजार तर वाहक, मदतनीस यांना 10 हजार ऊपये एकरकमी मानधन देण्यात येते. त्यासाठी संबंधित संस्थेस सरकारकडून अनुदान प्राप्त होत असते.









