महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती : जाधवनगर येथे इमारत बांधकामासाठी भूमिपूजन
बेळगाव : राज्यात बेळगाव हा सर्वात मोठा जिल्हा असून आरोग्य, शिक्षण, मनोरंजन यावर जोर देऊन मुलांमध्ये सकारात्मकता निर्माण करणे गरजेचे आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बेळगावात बालभवन उभारण्यात येत आहे. बेंगळूर शहरानंतर बेळगावातील बालभवन हे सर्वात मोठे असेल. बालभवनासाठी 20 कोटींचे अनुदान राखीव ठेवण्यात आले असल्याचे महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महिला-बालकल्याण खाते, बालभवन सोसायटी बेंगळूर, निर्मिती केंद्र व बालभवन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 17 रोजी जाधवनगर येथील एनसीसी कार्यालयाच्या मागील बाजूस जिल्हा बालभवन इमारतीचा भूमिपूजन समारंभ झाला. याप्रसंगी मंत्री हेब्बाळकर बोलत होत्या.
बालभवनासाठी नियोजित जागेची सध्याची किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे. महसूल खात्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या या जागेवर बालभवन उभारण्यासाठी संमती मिळाली असून ही आनंदाची बाब आहे. अंदाजे 3 एकर जागेत 20 कोटी रुपये अनुदानातून बालभवन उभारणार असून अलिकडेच 2 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. जिल्ह्यात महिला-बालकल्याण खात्याला स्वत:ची वास्तू नाही. त्यामुळे पुढील दिवसात या खात्यासाठी स्वत:ची इमारत बांधण्याची योजना आहे. एकूण 6 कोटी अनुदानापैकी 4 कोटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती हेब्बाळकर यांनी दिली. यंदाच्या वर्षात जिल्ह्यात 600 हून अधिक अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यात येतील. त्याचबरोबर काही अंगणवाड्यांचा दर्जा वाढविण्यासाठीही यादी तयार करण्यात आली आहे. यंदा अतिरिक्त पावसामुळे काही अंगणवाड्यांची पडझड झाली असून दुरुस्तीसाठी 200 अंगणवाडी केंद्रांना प्रत्येकी 1 लाख रुपये वितरण करण्यात आले आहेत.
सौंदत्ती येथे 10 कोटी रुपये अनुदानातून अतिथीगृह, व्यापारी गाडी सुरू करण्यात आलेली आहे. मागीलवर्षी उद्योगिनी योजनेंतर्गत महिलांना स्वावलंबी जीवनासाठी वैयक्तिक कर्ज देण्यात येणार असल्याचे सांगितले. आमदार आसिफ (राजू) सेठ म्हणाले, मुलांना खेळ, मनोरंजन यासाठी शहारात बालभवनाची गरज असून काही दिवसांतच बालभवन इमारत साकार होणार आहे. यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला मदत होईल. राज्य बालभवनचे अध्यक्ष नायडू, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, महिला बाल-कल्याण खात्याचे संचालक सिद्धेश्वर एन., बेंगळूरच्या जवाहर बालभवनाचे सचिव बी. एच. निश्चल, महिला-बालकल्याण खात्याचे उपसंचालक आर. नागराज, निर्मिती केंद्राचे योजना संचालक शेखरगौडा कुरडगी, तसेच अंगणवाडी कार्यकर्त्या भूमिपूजनप्रसंगी उपस्थित होते.
भव्य-सुंदर बालभवन उभारण्यासाठी प्रयत्न
बालभवनासाठी अनुदानाची कमतरता भासल्यास स्थानिक आमदारांशी चर्चा करून सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येईल. जिल्ह्यात भव्य व सुंदर बालभवन उभारण्यासाठी खात्याचे प्रयत्न असतील, असेही मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या.









