बकरी मंडईत लाखोंची उलाढाल : बाजाराला बहर : मागणी अधिक असल्याने दरही चढेच
प्रतिनिधी/ बेळगाव
ग्रामीण भागात यात्रांना सुरुवात झाली आहे. शिवाय बकरी ईद जवळ आला आहे. त्यामुळे शेळ्या-मेंढ्या व बकरी खरेदीला वेग आला आहे. शनिवारी बकरी मंडईत बकऱ्यांचा बाजार बहरला होता. विशेषत: शेळ्या-मेंढ्या आणि लहान पालवेदेखील विक्रीसाठी दाखल झाली होती. मागणी अधिक असल्याने बकऱ्यांचे दरदेखील चढेच असल्याचे पाहायला मिळाले.
बकरी मंडईत दर शनिवारी बकऱ्यांचा बाजार भरतो. विविध ठिकाणांहून बकरी विक्रीसाठी येतात. मात्र मागील काही दिवस हा बाजार थंडावला होता. आता यात्रा, मळेकरणी सुरू असल्याने बाजार भरू लागला आहे. शनिवारी बकरी मंडईत मोठ्या प्रमाणात शेळ्या-मेंढ्यांची विक्री झाली. पाच हजार रुपयांपासून वीस हजार रुपयांपर्यंत बकऱ्यांचे दर होते. मेंढ्यांच्या तुलनेत शेळी आणि पालव्यांची संख्या अधिक होती. यरगट्टी, पाच्छापूर, गोकाक, दड्डी , आदी ठिकाणाहून बकरी विक्रीसाठी आली होती. काही शेतकऱ्यांनीदेखील बकरी विक्रीसाठी आणली होती.
पाळणाऱ्या बकऱ्यांच्या खरेदीत वाढ
दरवर्षी पावसाला सुरुवात झाली की, सर्वत्र ओला चारा उपलब्ध होतो. त्यामुळे दुभत्या जनावरांबरोबर बकऱ्यांचीदेखील खरेदी विक्री वाढते. पावसाला लवकरच सुरुवात होईल आणि त्यानंतर सर्वत्र ओला चारा उपलब्ध होईल. या आशेने काही शेतकऱ्यांनी बकऱ्यांची खरेदी केली आहे. पावसाच्या तोंडावर पाळणाऱ्या बकऱ्यांची खरेदी वाढते. त्यामुळे शनिवारी बकरी मंडईत पाळणाऱ्या बकऱ्यांची खरेदीदेखील अधिक प्रमाणात झाली.









