ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाजपठण : एकमेकांना शुभेच्छांची देवाण-घेवाण : आबालवृद्धांसह सहभाग
प्रतिनिधी / बेळगाव
ईद-उल-फितरनंतर मुस्लीम बांधवांचा सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण म्हणजे बकरी ईद. इस्लामिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येते. कुर्बानीचा उत्सव म्हणून या ईदचे महत्त्व आहे. बेळगाव शहर आणि परिसरातील मुस्लीम बांधवांनी गुरुवारी बकरी ईद उत्साहात साजरी केली. सकाळी ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाजपठण करण्यात आले. यानंतर एकमेकांना शुभेच्छांची देवाण-घेवाण करत हा सण साजरा झाला.
बकरी ईद साजरी करण्यासाठी मुस्लीम बांधव सज्ज होते. चंद्रदर्शनानंतर ईद साजरी करण्यात येते. बुधवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर गुरुवारी मुस्लीम बांधवांनी मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी केली. बेळगाव शहर परिसरातील मुस्लीम बांधव कोर्ट आवारानजीकच्या इदगाह मैदानात दरवषी जमतात. तेथूनच ईदच्या उत्साहाला सुऊवात होते. यानंतर मेजवान्या तसेच मशिदींमध्ये धार्मिक विधी केले जातात. गुरुवारीही हे वातावरण पाहावयास मिळाले. सामूहिक नमाजपठण झाल्यानंतर अब्दुलरजाक मोमीन, शिराज असर्रफ यांनी नमाजपठण केले. त्यानंतर मुफ्ती अब्दुल अजिज खाजी, मुफ्तीजुहेर अहमद खाजी, मुफ्ती मंजुर अलेमी यांनी या सणाचे महत्त्व सांगितले.
अनगोळ, शहापूर, टिळकवाडी, वडगाव आदी परिसरातील मुस्लीम बांधवांनीही आपापल्या परिसरात नमाजपठण करून ईदचा आनंद लुटला. सकाळच्यावेळी रस्ते गर्दीने फुलले होते. सायंकाळी ईदच्या निमित्ताने खरेदीचा आनंद लुटला जात होता. ईद-उल-जुहाचा अर्थ त्यागाची ईद असा आहे. मुस्लीम बांधवांमध्ये ईद-उल-जुहाला विशेष महत्त्व आहे. यादिवशी नातेवाईक एकत्र येऊन एकमेकांना भेटवस्तू, मिठाई देतात. इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लीम बांधव बकऱ्याची कुर्बानी देतात. यासाठी आधी बकऱ्याचे पालनपोषण करून त्याची काळजी घेतली जाते. त्यानंतर कुर्बानी देऊन हा सण साजरा केला. यावेळी एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. लहान मुलांसह वृद्धांनीही या नमाजपठणमध्ये भाग घेतला होता.









