गावात नागरी सुविधांचा अभाव : बेळवट्टी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : नागरिकांतून तीव्र संताप : ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत
वार्ताहर/किणये
तालुक्याच्या पश्चिम भागातील बाकनूर गाव अडकलेय समस्यांच्या गर्तेत. या गावात सुरळीत वीजपुरवठा नाही, पाणी नाही, गटारींची समस्या निर्माण झाली आहे. साफसफाई नाही. त्यामुळे नागरिक अक्षरश: वैतागून गेलेले आहेत. बेळवट्टी ग्रामपंचायतीचे या गावाकडे अक्षरश: दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आता नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत. बाकनूर गावात नागरी सुविधांची वानवा निर्माण झाली आहे. या गावात पिण्याचे पाणी नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील नळांना तीन ते चार दिवसातून एकदा पाणी येत आहे. त्यामुळे महिला वर्गाला शेत शिवारातील पाणी आणून स्वयंपाक करावा लागत आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
कूपनलिकांना पाणी कमी असल्याने पिण्याची पाण्याची समस्या
गावात गेल्या चार ते पाच वर्षापासून गटारींची साफसफाई करण्यात आलेली नाही. गटारीच्या पाण्याचा योग्यप्रकारे निचरा होत नसल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गावात सरकारी विहीर आहे. मात्र या विहिरीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. दोन कूपनलिका आहेत. मात्र या कूपनलिकांना पाणी अत्यंत कमी आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
अंगणवाडीची अक्षरश: दुर्दशा
गावच्या अंगणवाडी केंद्राला गळती लागलेली आहे. यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. या अंगणवाडीचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपूर्वी करण्यात आलेले आहे. ते बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. गावातील 25 ते 30 बालके या अंगणवाडीत जातात. मात्र अंगणवाडी केंद्राची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. अंगणवाडी केंद्राच्या बाजूलाच सार्वजनिक विहीर आहे. या विहिरीवर झाकण बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे इथे धोका निर्माण झाला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
स्मशानभूमीमध्ये शेडसाठी केवळ कॉलमची उभारणी
गावातील स्मशानभूमीची अवस्था बिकट आहे. या स्मशानभूमीत शेड बांधण्यासाठी केवळ कॉलम उभारण्यात आले आहेत. पावसाळ्यात येथे समस्यांचा सामना करावा लागत आहे. स्मशानभूमीमध्ये शेड उभारायचे नव्हते तर कॉलम भरणी तरी का केली, असेही नागरिकांतून विचारणा होत आहे.
गावात खड्डेमय रस्ते
गावाकडे येणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. गल्ल्या गल्ल्यांमधील रस्ते खड्डेमय बनलेले आहेत. गावात इतक्या सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. तरीही ग्रामपंचायतचे दुर्लक्ष झाले आहे. गावात तीन ग्रामपंचायत सदस्य आहेत. मात्र तेही दुर्लक्ष करत आहेत. मग आम्ही न्याय मागायचा कोणाकडे? असा सवाल नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे.
ग्रामस्थ मोर्चा काढण्याच्या तयारीत
गावात विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत. गटारी, पाणी, रस्ते या सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. दरवर्षी ग्रामपंचायत निवेदन देऊनही याकडे कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे आता गावातील तरुणांनी यावर आवाज उठविला आहे. येत्या दोन दिवसात मोर्चा काढण्याच्या तयारीत ग्रामस्थ आहेत.
– संदीप गोडसे









