माजी सैन्यप्रमुखांवर केला नवा आरोप
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी भारतासोबत मैत्री प्रस्थापित करण्यासाठी तत्कालीन सैन्यप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी दबावा टाकला होता असा आरोप केला आहे. पाकिस्तानात जर 90 दिवसांमध्ये निवडणूक न झाल्यास घटना वाचणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मागील महिन्यात पाकिस्तानने भारतासोबत पडद्याआड चर्चा सुरू नसल्याचा दावा केला होता, परंतु भारतासोबत शांतता राखण्याची इच्छा व्यक्त केली होती. सद्यकाळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात कुठल्याही प्रकारे चर्चा सुरू नाही. दोन्ही शेजारी देशांमधील संबंध मागील अनेक वर्षांपासून स्थिर असल्याचे विधान पाकिस्तान विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज जहरा बलोच यांनी केले आहे.
2019 मध्ये पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार रोखला होता. परंतु 2021 मध्ये दोन्ही देशांदरम्यान पडद्याआडून चर्चा झाल्याने द्विपक्षीय संबंधांमधील तणाव काहीसा कमी झाला होता. फेब्रुवारी 2021 मध्ये संयुक्त अरब अमिरातमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱयांदरम्यान गुप्त बैठका होत नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी लागू झाली होती.









