वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे अव्वल मल्ल बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांना 23 सप्टेंबरपासून चीनमधील हेंगझोयू येथे सुरु होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी थेट प्रवेश देण्यात आला आहे. विश्व कुस्ती फेडरेशनच्या सुकानू समितीने हा निर्णय त्यांच्या राष्ट्रीय प्रमुख प्रशिक्षकांच्या संमतीशिवाय घेतला आहे.
आगामी आशियाई स्पर्धेसाठी आता ऑलिंपिक पदक विजेता मल्ल बजरंग पुनिया पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाईल गटात तसेच विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेतील पदक विजेती मल्ल विनेश फोगट महिलांच्या 53 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेसाठी फ्रीस्टाईल आणि ग्रिकोरोमन या दोन प्रकारातील सहा विविध वजन गटामध्ये चाचणी स्पर्धा घेतली जाणार आहे. पण या चाचणी पूर्वीच बजरंग आणि विनेश यांची आशियाई स्पर्धेसाठी थेट निवड केली आहे. या दोन्ही मल्लांना निवड चाचणी स्पर्धेतून वगळण्यात आल्याची माहिती सुकानू समितीच्या सदस्यांनी दिली आहे. ही निवड चाचणी स्पर्धा महिलांच्यासाठी 22 जुलै रोजी तर पुरुषांसाठी 23 जुलै रोजी नवी दिल्लीत घेतली जाणार आहे.









