वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पॅरीस ऑलिंम्पिक स्पर्धेला आता केवळ सात महिन्यांचा कालावधी बाकी असल्याने देशातील कुस्तीचे उपक्रम पुन्हा सुरू करण्याची मागणी ऑलिंम्पिक पदक विजेता मल्ल बजरंग पुनियाने क्रीडा मंत्रालयाकडे केली आहे. प्रत्येक चार वर्षांनी होणाऱ्या या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय मल्लांना सरावावर अधिक भर द्यावा लागणार आहे.
गेल्या कांही महिन्यांपासून भारतीय कुस्ती क्षेत्रातील खळबळजनक घटना झाल्याने हे क्षेत्र स्थीर राहिले आहे. देशातील अव्वल मल्लांनी अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष तसेच भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांना कडवा विरोध दर्शविल्याने सदर कुस्ती फेडरेशनला निवडणूक घेण्याचा आदेश बजावण्यात आला होता. यानंतर ब्रिजभूषण शरण सिंग यांचे कट्टर समर्थक संजय सिंग यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पण भारतीय मल्लांनी संजय सिंग यांच्या निवडीला कडवा विरोध दर्शविल्याने भारतीय कुस्ती क्षेत्रामध्ये मल्ल आणि पदाधिकारी यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने क्रीडा मंत्रालयाला संजय सिंग यांची निवड रद्द करावी लागली. तसेच कुस्ती फेडरेशन बरखास्त करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या क्षेत्रामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याने भारताच्या अनेक पुरूष आणि महिला मल्लांनी कुस्ती क्षेत्रातून निवृत्त होण्याचे ठरविले. त्याचप्रमाणे विनेश फोगटने खेलरत्न पुरस्कार तसेच अर्जुन पुरस्कार शासनाकडे परत करण्याचा निर्णय घेतला.









