सरदार्स मैदान-धर्मवीर संभाजी महाराज उद्यानापर्यंतचा मार्ग
बेळगाव : विश्व हिंदू परिषद, बजरंग दलच्यावतीने रविवार दि. 16 रोजी संचलन होणार आहे. दुपारी 3 वाजता सरदार्स हायस्कूल मैदानातून या शौर्य संचलनाला सुरुवात होणार असून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान, महाद्वार रोड येथे सांगता होणार आहे. त्यानंतर 5 वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे आनंद करलिंगन्नावर यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून बजरंग दलचे राष्ट्रीय संयोजक नीरज डवनेरिया उपस्थित राहणार आहेत. गदग येथील शिवानंद ब्रह्म मठाचे शिवानंद स्वामी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल. शौर्य संचलनामध्ये 2 हजारहून अधिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. गीता जयंतीच्या दिवशी बाबरी मशीद पाडून तेथे लहानसे मंदिर बांधण्यात आले. त्याचे प्रतीक म्हणून शौर्य संचलन केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मुनीस्वामी भंडारी, डॉ. आर. के. बागी, संतोष मादिगार, लक्ष्मण मिसाळे, संतोष हत्तरकी यासह इतर उपस्थित होते.









