दुचाकी, तिचाकी इलेक्ट्रीक वाहनांचे उत्पादन घटवले
नवी दिल्ली : चीनमधून दुर्मिळ खनिजांची आयात थंडावली असल्याकारणाने आता वाहन कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या उत्पादनामध्ये घट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने बजाज ऑटोला सर्वप्रथम धक्का बसल्याचे समजते. दुचाकी, तिचाकी वाहन क्षेत्रातील कंपनी बजाज ऑटोने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये इलेक्ट्रिक दुचाकींचे उत्पादन निम्म्यावर घेणार असल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक तिचाकीचे उत्पादनही 75 टक्केपर्यंत कमी करण्यात आल्याची माहिती उपलब्ध होते आहे. तिमाही निकालाची घोषणा केल्यानंतर बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा म्हणाले की जुलैपासूनच इलेक्ट्रिक दुचाकींच्या वाहन उत्पादनामध्ये कपात करण्यात आलेली असून हीच कपात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कायम ठेवली जाण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे.
एप्रिलपासून पुरवठा ठप्प
गेल्या एप्रिल महिन्यापासून इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणारा दुर्मिळ खनिजांचा पुरवठा चीनने बंद केला असल्याकारणाने विविध ऑटो कंपन्यांपुढे सध्याला चिंतेचे ढग निर्माण झालेले आहेत. इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनांच्या बाबतीत बजाजला जशी झळ बसते आहे तशी भविष्यात इतर या क्षेत्रातील कंपन्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकार याबाबतीत कोणत्या उपाययोजना करणार याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.









