वृत्तसंस्था/ मुंबई
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस बिगर बँकिंग वित्त कंपन्यांच्या शर्यतीत उतरली असून या पाठोपाठ आता इतर कंपन्याही या क्षेत्रामध्ये उतरण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. यामध्ये आता बजाज फायनान्सची भर पडणार आहे. यासह आगामी काळात जवळपास दहा कंपन्या बिगर बँकिंग वित्त कंपन्यांच्या शर्यतीमध्ये उतरणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बजाज फायनान्स मायक्रो तसेच एसएमइ क्षेत्राकरीता व चारचाकी आणि ट्रॅक्टर यासाठी वित्त पुरवण्यासाठी आपली योजना बनवत आहे. पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये बजाज फायनान्सला 1 हजारहून अधिक शाखा स्थापन करायच्या आहेत. दोन ते तीन वर्षांमध्ये वरील गटासाठी कर्ज पुरवण्यासाठीची योजना बनवली जात असून आगामी काळात ती अंतिम केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बजाज फायनान्स कंपनीने देशातील 4000 शहरांमध्ये व्यवसायाचे आपले जाळे विस्तारले असून ते नजिकच्या काळात 5000 शहरांपर्यंत पर्यंत पोहोचणार आहे.









