वार्ताहर/कणकुंबी
बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्यांपैकी कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील नूतन पुलाचे काम रखडल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक बैलूर व खानापूरमार्गे वळविण्यात आली होती. त्यामुळे अगोदरच खड्डेमय असलेल्या बैलूर रस्त्याची पूर्णपणे वाताहात झाली आहे. ग्राम पंचायत युनियनचे तालुका अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी बैलूर रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात उपोषणाचा इशारा देताच बैलूर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली.गेले दीड-दोन महिने बैलूरमार्गे बेळगाव, गोवा तसेच स्थानिक पातळीवरील सर्व वाहतूक सुरू झाल्यापासून बैलूर रस्त्याची पूर्णपणे वाताहात झाली आहे.
बैलूर ग्राम पंचायत अध्यक्ष आरोही सावंत तसेच ग्रा.पं. युनियनचे तालुका अध्यक्ष यांनी कंत्राटदाराला तगादा लावल्याने सोमवारपासून बैलूर क्रॉस ते बैलूर या पाच किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम कंत्राटदाराने सुरू केलेले आहे.महिन्यापासून बैलूर रस्त्यावरील वाहनांचा ताण वाढल्याने या रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली. साधी मोटारसायकलही चालवणे मुश्किल झाले आहे. या रस्त्यावरील वाहनांचा ताण वाढल्याने रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता अशीच अवस्था या रस्त्याची झाली होती. त्यामुळे बैलूर ग्रा.पं. अध्यक्षा सावंत, प्रदीप कवठणकर व इतर सदस्यांनी कंत्राटदाराला रस्ता दुरुस्तीसंदर्भात तगादा लावला होता. तसेच विनायक मुदगेकर यांनीही रस्तादुरुस्तीचे काम जर हाती घेतले नाहीतर उपोषणाचा इशारा दिला. त्यामुळेच प्रशासन खडबडून जागे झाले आणि कंत्राटदाराने सोमवारपासून रस्ता दुरुस्तीला सुरुवात केली आहे









