बेळगाव लोकायुक्त कार्यालयाची कारवाई
बेळगाव : बैलहोंगल प्रांताधिकारी कार्यालयातील एका क्लार्कला 60 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. बेळगाव येथील लोकायुक्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी ही कारवाई केली आहे. या कारवाईने एकच खळबळ माजली आहे. मंजुनाथ अंगडी असे लोकायुक्तांनी अटक केलेल्या क्लार्कचे नाव आहे. लोकायुक्त विभागाचे पोलीसप्रमुख हणमंतराय, पोलीस उपअधीक्षक बी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अन्नपूर्णा हुलगूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. अटकेनंतर या अधिकाऱ्याला सायंकाळी बेळगावला आणण्यात आले. चिक्कोप्पा एस. के. येथील रवी गुरुनाथ अज्जी यांनी आपल्या शेतजमिनीच्या कागदपत्रात बदल करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात अर्ज दिला होता. कॉलम क्र. 11 मध्ये रिग्रँट कमी करून रयतवारी अशी नोंद करण्यासाठी मंजुनाथ यांनी 60 हजार रुपयांची लाच मागितली होती. क्लार्कने लाच मागताच रवी यांनी बेळगाव येथील लोकायुक्त पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. बुधवारी 60 हजार रुपये लाच घेताना क्लार्कला रंगेहाथ अटक करण्यात आली. त्याला येथील चतुर्थ अतिरिक्त जिल्हा सत्र व विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.









