प्रतिनिधी/ बेळगाव
बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचा अवमान झाल्यानंतर धर्मवीर संभाजी चौक येथे म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यानंतर म. ए. समिती कार्यकर्त्यांवर कॅम्प पोलीस स्थानकामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामधील प्रकाश शिरोळकर, माजी महापौर सरिता विराज पाटील, मयूर गणपती पाटील यांनी शुक्रवारी न्यायालयातून जामीन घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचा अवमान झाल्यानंतर 18 डिसेंबर 2021 रोजी धर्मवीर संभाजी चौक येथे आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी 53 जणांवर गुन्हे दाखल केले होते. यामधील 6 जण वगळता इतर सर्वांनी जामीन मंजूर करून घेतला आहे. शुक्रवारी पाचवे अतिरिक्त दिवाणी आणि जेएमएफसी न्यायालयाने या तिघांनाही जामीन मंजूर केला आहे.
न्यायालयाने 10 हजार रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र आणि तितक्याच रकमेचा एक जामीनदार यासह इतर अटींवर जामीन मंजूर केला. पुढील सुनावणी 4 जानेवारी रोजी होणार आहे. या सर्वांच्यावतीने अॅड. श्यामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचन्नावर हे काम पाहत आहेत.









