प्रतिनिधी /ओरोस
Bail denied to suspect in case of sexual assault on minor girl
एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्यावर गर्भारपण लादल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या मिलिंद मालोजी पुजारे वय ३२ रा. कलंबई देवगड याचा जामीन अर्ज विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती सानिका जोशी यांनी नामंजूर केला आहे. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
तू मला आवडतेस मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे सांगून संशयित आरोपीने एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला होता. १२ जानेवारी ते २७ एप्रिल २०२३ या कालावधीत ही घटना घडली होती. त्यानंतर मासिक पाळी वेळेवर न आल्याने मुलीच्या करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याची बाब समोर आली होती. ६ मे रोजी याबाबतची तक्रार पोलिसांत देण्यात आली होती.
दाखल तक्रारी नुसार पोलिसांनी संशयित आरोपी मिलिंद पुजारे याच्यावर बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून ७ मे रोजी त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला १० तारीख पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती तर त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान संशयित आरोपीने न्यायालयाकडे जामिनासाठी विनंती अर्ज सादर केला होता. यावरील सुनावणीत डी एन ए बाबतचा वैज्ञानिक प्रयोग शाळेचा अहवाल येणे बाकी आहे तत्पूर्वी आरोपीला जामीन देणे योग्य होणार नाही. तसेच पीडित मुलगी गरोदर असल्याने तिला व तिच्या कुटुंबाला धोका होण्याची शक्यता असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत जामीन नामंजूर करण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. दरम्यान हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने संशयित आरोपी मिलिंद पुजारे याचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे.









