15 फेब्रुवारीला मारहाणीत झाला होता खून
बेळगाव : गोव्याचे माजी आमदार व निवृत्त पोलीस अधिकारी असणाऱ्या लवू सूर्याजी मामलेदार (वय 67) यांच्या खून प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने जामीन नाकारला आहे. शुक्रवारी येथील दहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गुरुराज शिरोळ यांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. 15 फेब्रुवारी रोजी दुपारी खडेबाजार येथील श्रीनिवास लॉजसमोर फेंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी मार्केट पोलिसांनी अमिर सोहेल उर्फ मुजाहिद शकील सनदी (वय 27 रा. सुभाषनगर) या ऑटोचालक तरुणाला त्याच दिवशी मार्केट पोलिसांनी अटक केली होती. त्याच दिवशी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली होती.
मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णवर, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णवर यांनी या प्रकरणाचा तपास करून पुरावे जमविले आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी अमिर सोहेल उर्फ मुजाहिदने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. पोलिसांनी याला हरकत घेतली होती. शुक्रवारी या अर्जावर सुनावणी होऊन त्याचा जामीन फेटाळला आहे. पोलिसांनी अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने या प्रकरणाचा तपास चालवला आहे. श्रीनिवास लॉजवरील सीसीटीव्हीचे फुटेज वैज्ञानिक पृथ्थकरणासाठी विधीविज्ञान प्रयोग शाळेला पाठविण्यात आले आहेत. संशयित आरोपीचा फोटो व सीसीटीव्ही फुटेज पाठविण्यात आले असून फुटेजमध्ये तोच आहे का? याची पडताळणी करण्यात येत आहे.









