वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/ गोरखपूर
गीता प्रेसचे विश्वस्त बैजनाथ अग्रवाल यांचे वयाच्या 90 व्या वषी निधन झाले. बैजनाथ अग्रवाल यांनी गोरखपूर येथील हरिओम नगर येथील राहत्या घरी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अडीच वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांचा पुत्र देवी दयाल अग्रवाल यांनीच शनिवारी सकाळी त्यांच्या निधनासंबंधीची माहिती दिली.
1933 मध्ये जन्मलेल्या आणि हरियाणातील भिवानी येथील मूळ रहिवासी असलेल्या बैजनाथ अग्रवाल यांनी 1950 मध्ये वयाच्या अवघ्या 17 व्या वषी गीता प्रेसमध्ये सामान्य कर्मचारी म्हणून काम सुरू केले. धर्मावरील त्यांची गाढ श्र्रद्धा आणि संस्कृतीला चालना देण्याची त्यांची इच्छा लक्षात घेऊन 1983 मध्ये त्यांना गीता प्रेसचे विश्वस्त बनवण्यात आले. तेव्हापासून ते वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या होत्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी गीता प्रेसमधून प्रकाशित झालेली पुस्तके आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध भाषांमधील पुस्तकांचे प्रकाशन यासह अनेक निर्णय घेतले. एकेकाळी गीता प्रेसमधील कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या काळात त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले, मात्र विचलित न होता त्यांनी एकंदर परिस्थितीचा सामना करत कर्मचाऱ्यांना मदत केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची श्रद्धांजली
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अग्रवाल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. गोरखपूरच्या गीता प्रेसचे विश्वस्त बैजनाथ अग्रवाल जी यांचे निधन अत्यंत दु:खद आहे. गेली 40 वर्षे त्यांनी आपले जीवन सामाजिक भान आणि मानव कल्याणासाठी समर्पित केले होते. त्यांच्या निधनाने समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.









