जिथे कधी थंडी पडत नाही असे भागही थंडीने काकडून निघतायत. गोडय़ा पाण्याच्या संगतीत राहणारे कोकणातले राजापूर, चिपळूण आणि एकूणच सह्याद्रीपट्टीतील भाग तर गारठून निघतायत. घाटमाथ्यावर तर थंडीचं ऑफिशिअल राज्य! हिमालयावरून येणाऱया बोचऱया वाऱयाने उत्तर भारत गोठतोय. पण साधारणपणे भारतातल्या सर्व प्रदेशांत लोहरी, पोंगल, संक्रांत, उत्तरायण, तिळुआ अशा नावाने मोठय़ा हौसेने संक्रांतीचा सण साजरा होतोय. हाती आलेली खरिपाची पिकं, साजऱया होणाऱया हुरडा पाटर्य़ा, गाजरं, बोरं, ताज्या रसरशीत हिरव्या भाज्या, उसाचे करवे अशी सगळी समृद्धी लक्ष्मीच्या पावलांनी येतेय आणि गृहिणींना समाधानाने हसवतेय. गावोगावच्या जत्रा सुरू आहेत. तिळगुळाचा गोडवा जिभेवर आहे. मग तो गाण्यांमध्ये पाझरल्याशिवाय कसा राहील? तमाशाच्या फडातल्या रसिकांसाठी खास या दिवसांच्या निमित्ताने एक जुनी लावणी गाजत असेल.
ह्यो धारवाडी जरीचा शालू हाय पिवळा
आत लपलाय वो रुपाचा खजिना कवळा
ह्यो सातारी पेढा न अबलख घोडा अस्सल मराठमोळा
तिळगुळ घ्या हो गोड गोड बोला
लाडीनं सांगते गोडीनं सांगते मनात भाव हाय भोळा
तिळाचा खमंगपणा आणि गुळाच्या गोडव्यापाठी लपलेला किंचितसा आंबटशौक असणारा तिळगूळ तोंडात टाकला की त्या चवीचा स्फोट आवरायचा तर इतकी ठसकेबाज लावणीच शौकिनांना गोड लागत असावी. ‘सुगंधी कट्टा’ मधली ही लावणी आशाताईंनी अशी नखरेल सुरांत गायलीय आणि तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्री अशी झक्कास जमलीय की नव्या पिढीतल्या लावणी डान्सरही ती आवर्जून सादर करतात. एक तीळ सातजणात वाटून खावा असे म्हणतात. यातूनच तिळाचं महत्त्व अबाधित असल्याचं कळतंच. तोच तीळ तिळगूळ, लाडू, वडी, गजक वगैरेंची साथ सोडून एकाएकी एखाद्या सुंदरीच्या गाली, ओठी वगैरे येऊन बसला तर मग आशिक मंडळींना त्या तिळाला कुठे ठेवावं आणि काय करावं हे सुचेनासं होतं. आता औचित्य सोडता येत नाही आणि असभ्य वर्तन करणं तर शिक्षेस पात्र..मग काय करावं.
जरा आँखो में काजल लगा लो सनम
सुर्ख चेहरे पे जुल्फें गिरा लो सनम
तेरे गालों पे जो काला तिल है
वहीं मेरा दिल है वहीं मेरा दिल है
असं सूचकपणे म्हणावं लागतं. अनिल कपूर आणि काजोलची जोडी असलेल्या ‘हम आपके दिल में रहते हैं’ मधलं हे गाणं आहे अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या स्वरातलं!
तशी म्हणाल तर तिळाबद्दल गाणी बरीच आहेत. पण आताशा संक्रांत ही तिळगुळापेक्षा पतंगाशी जास्त दोस्ती ठेवून असते की काय असं वाटतं. अर्थात संक्रांत म्हणजे संक्रमण. सतत बदल हेच तिचं वैशिष्टय़! या दिवसात सकाळच्या उन्हात बसणं शरीराला नैसर्गिक ऊब मिळण्यासाठी लाभदायक असतं. गुजरात, राजस्थानमध्ये पतंग उडवण्याची प्रथा यामुळे जास्त प्रमाणात प्रचलित आहे. कारण तिथली थंडी जास्त असते. आणि ती घालवण्यासाठी शरीराची सकाळी हालचाल होणं गरजेचं ठरतं म्हणूनही असावं. पण पतंग उत्सव साजरा करणारं एक सुरेख गाणं ‘हम दिल दे चुके सनम’ मध्ये घडलं आणि त्याने इतिहास घडवला. विक्रम गोखले, स्मिता जयकर, सल्लूमियां, ऐश्वर्या राय आणि इतरही सगळी तगडी स्टारकास्ट आणि पूर्ण कौटुंबिक उत्सवाचा माहोल असं ते गाणं आहे. त्याची सुरुवातच कायपोचे।़।़।़ या आरोळीने होते.
ढील दे ढील दे दे रे भैया
इस पतंग को ढील दे
जैसे ही मस्ती में आए
इस पतंग को खींच दे हे…
ऐकणाऱया म्हाताऱयांनाही ताक् धिना धिन् करायला लावेल असं जोशपूर्ण गाणं आहे हे. पिक्चर पूर्ण झाल्यावर कळतं की त्या गाण्यातल्या
तेरी पतंग तो गई काम से
कैसे कटी? उडी थी शान से
चल सरक जा खिसक
तेरी नहीं थी वो पतंग
वो तो गई किसी के संग संग संग…
या ओळी म्हणजे पुढे घडणाऱया अप्रिय घटनेची सूचक नांदी होती. नंदिनी म्हणजेच ऐश्वर्या त्याच्या हातून निसटून कायमची दुसऱयाची होणार असते. खरंच सुंदर पिक्चर आहे. देखे सो जाने…पण पतंगाची कामगिरी लाजवाब! रईस मधलं
उडी उडी जाय उडी उडी जाय
दिल की पतंग कैसे उडी उडी जाय.
ये जो पतंग है तेरे ही संग है
तेरी ही ओर देख मुडी मुडी जाय
आहेत की नाही ऐकणाऱयाला पतंगापेक्षा जास्त हवेत नेणाऱया ओळी? यात स्त्रीस्वराचा खूप वेगळा असा बेसमधला आवाज वापरलाय. जो आहे भूमी त्रिवेदी यांचा आणि सोबतीला ऑल टाइम हिट सुखविंदर सिंग! ‘फुकरे’ चित्रपटामधलं एक झणझणीत गाणं असंच पतंगाच्या साथीने फुलतं.
‘अंबरसरिया मुंडिया वे कचिया कलियां न तोड,
तेरी माँने बोले है मुझे तीखें से बोल.
बिचारा शहाणा असला तर तिच्याशी जमवण्याचा विचार सोडून देणं फायद्याचं, हे त्याला कळत असेल. पण नाही… प्रेम आणि पतंग हे एकदा हातातून सुटले की मातीत मिळेपर्यंत कुणाला ऐकत नाहीत हे खरं. अस्सल अंबरसरिया अर्थात अमृतसरी असो किंवा मराठी असो, घरात भविष्यात झडणाऱया सामन्याची लक्षणं त्याला जाणवली असतील, पण… लग्नानंतर…पतंग कटने के बाद ढील दो या फिर खींच दो.. नुकसान त्याचंच… हां! आता मराठी मुलगी जर पतंग उडवायला उतरली तर मात्र ती ठेक्मयात
चढाओढीनं चढवित होते
गं बाई मी पतंग उडवीत होते
म्हणत म्हणत अनेकांच्या दिलाचे पतंग सरासर कापतच उतरते. जातिवंत खोडसाळ वृत्तीने जेंव्हा ती
माझ्या दोऱयानं तुटला दोरा
एक पतंग येई माघारा
हो गेला गुंतत गिरवित गोते
गिरवित गोते हो गिरवित गोते
असं म्हणून खटय़ाळ हसू लागते तेव्हा एरवी पतंग आकाशात असलेलेही खुशीने कटलेले असतात. आणि अशा गाण्यांना तसाच मधाळ स्वर देणं हे फक्त आणि फक्त आशाताईंचंच स्पेशलायझेशन. बाकी पतंगाची गाणी म्हणायची तर चली चली मेरी पतंग चली रे, कायपोचे मधलं मांजा, अगदी कटी पतंगचं टायटल साँगसुद्धा, अशी भरपूर आहेत. पण आपण मनही पतंगाच्या हालचालीबरोबर झोले घेऊ लागेल असं एकच गोड गाणं आहे. थ्री इडियट्समधलं. हो तेच ते
बहती हवा सा था वो उडती पतंग सा था वो
कहा गया उसे ढूँढो…
-ऍड. अपर्णा परांजपे-प्रभू








