साबांखामंत्री नीलेश काब्राल यांच्याकडून स्पष्ट : केवळ चार घरांचे नुकसान, मंदिरांना धोका नाही,लहानसहान 17 व्यावसायिकांवर होणार कारवाई
पणजी : भोम येथील रस्त्याच्या प्रस्तावित चौपदरीकरणाला स्थानिकांचा जोरदार विरोध होत असतानाच काल सोमवारी सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी हे चौपदरीकरण होणारच असे ठामपणे सांगून तेथे कोणत्याही परिस्थितीत बगलमार्ग (बायपास) होणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले आहे. मंत्रालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री काब्राल यांनी प्रात्यक्षिकाद्वारे भोम चौपदरीकरण रस्त्याची माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले, भोम येथे दोन मंदिरे पाडण्यात येणार आहेत, असे सांगून विरोधक स्थानिकांची दिशाभूल करीत आहेत. ती त्यानी करु नये. तेथील मंदिरांना हात लावला जाणार नाही. 1991-1992 मध्ये राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमणे केली आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
घरमालकांना जमीन, आर्थिक मदत
महामार्गाचे काम करताना केवळ 4 घरांना धोका आहे. ही घरे महामार्ग बनविताना पाडल्यास घरमालकांना 300 स्क्वे. मी. जमीन व आर्थिक मदतही देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी घेतलेले ड्रोन फुटेज वापरून त्यांनी यावेळी पत्रकारांसमोर सादरीकरण केले. ज्या लोकांच्या मनात संभ्रम असेल त्यांनी कार्यालयात येऊन केव्हाही हे सादरीकरण पहावे, आपले त्याला सहकार्य असेल असे मंत्री काब्राल यांनी सांगितले.
विभाजन न झाल्याने सर्वांना नोटिसा
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भोम येथील रहिवाशांना दिलेल्या नोटिसीबद्दल पत्रकारांनी विचारले असता मंत्री काब्राल म्हणाले, सर्व्हे क्रमांक 6 चा काही भाग ताब्यात घेतला जात आहे. त्या सर्व्हे क्रमांकाचे विभाजन न झाल्याने सर्व्हे क्रमांकातील सर्व 64 घरांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. फोंडा ते भोम या चौपदरीकरणाच्या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यापूर्वीच 575 कोटी ऊपये मंजूर केले आहेत.
विरोधकांनी संभ्रम निर्माण करु नये
विरोधकांनी स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहन मंत्री काब्राल यांनी केले. भोम येथे हातगाडे व लहान लहान दुकाने थाटून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या 17 आहे. त्यांच्यावरही कारवाई होईल. पण, यामध्ये स्थानिक व्यावसायिक असल्यास त्यांना मदत देण्याचा विचारही सुरू आहे, असे मंत्री काब्राल म्हणाले.









