पायाभूत सुविधा मंत्री एम. बी. पाटील यांची माहिती : उत्तर कर्नाटकातील दोन रेल्वेमार्ग योजनांचा घेतला आढावा
प्रतिनिधी/ बेंगळूर
बागलकोट-कुडची रेल्वेमार्गाचे काम डिसेंबर 2025 पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती पायाभूत सुविधा विकास मंत्री एम. बी. पाटील यांनी दिली. बुधवारी उत्तर कर्नाटकातील दोन महत्त्वाच्या रेल्वे योजनांसंबंधी त्यांनी बेंगळूरमध्ये प्रगती आढावा बैठक घेतली. यावेळी गदग-वाडी आणि बागलकोट-कुडची रेल्वेमार्गाच्या कामांविषयी चर्चा करण्यात आली.
बैठकीप्रसंगी ते म्हणाले, बागलकोट-कुडची रेल्वेमार्ग योजनेसाठी 1,530 कोटी रुपये खर्च होणार आहे. या योजनेसाठी आवश्यक 2,496 एकरपैकी 2,476 एकर जागा रेल्वे खात्याला देण्यात आली आहे. उर्वरित 20 एकर जागा लवकरच देण्यात येईल. डिसेंबर 2025 पूर्वी या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर कर्नाटकातील आणखी एक महत्त्वाच्या 257 कि. मी. लांबीच्या गदग-वाडी रेल्वेमार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेकरिता राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय 50:50 प्रमाणात अनुदान देणार आहे. एकूण 1922 कोटी रुपयांची ही योजना आहे. या योजनेसाठी आवश्यक 4,002 एकर जमीन आवश्यक आहे. त्यापैकी 3,945 एकर जमीन देण्यात आली आहे. उर्वरित 57 एकर जमीन महिनाभरात देण्यात येईल, अशी माहिती मंत्री एम. बी. पाटील यांनी दिली.
गदग-वाडी रेल्वेमार्गातील गदग ते तळकलपर्यंत रेल्वेमार्ग सध्या अस्तित्वात आहे. तळकलपासून कुष्टगीदरम्यानच्या 57 कि. मी. पैकी हनुमपूरपर्यंतच्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. कुष्टगीपर्यंतच्या मार्गाचे काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर येथे पायोगिक तत्त्वावर रेल्वे सुरू होतील, असेही त्यांनी सांगितले.
गदग-वाडी रेल्वेमार्गा कामाचा उत्तम दर्जा राखण्यावर भर द्यावा, अशी मागणी यलबुर्गाचे आमदार बसवराज रायरे•ाr यांनी केली. त्यावर एम. बी. पाटील यांनी बैठकीत सहभागी झालेल्या रेल्वे अधिकाऱ्यांना कामाच्या दर्जा उत्तम राखण्याची सूचना केली. कामे सुरू असलेल्या ठिकाणी पथक पाठवून दर्जाची खातरजमा करून घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. एकंदर या रेल्वेच्या कामासाठी मार्च 2026 ही मुदत ओलांडू नये. मुदत ओलांडून पुन्हा खर्चात वाढ होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.









