Bag left on the road during the journey returned to the woman
सांगेली सरपंच व सहकाऱ्यांचा प्रामाणिकपणा
सावंतवाडी ते आंबोली प्रवासादरम्यान भर रस्त्यावर मातोंड – पेंडूर येथील एका महिलेची रोख रकमेसह महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग मिळताच सांगेली सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरीत सावंतवाडी पोलीस स्थानकात जमा करीत सतर्कतेसह प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले.
पेंडुर येथील श्रीमती मुणगेकर या मोटर सायकलवरून आंबोलीच्या दिशेने जात होत्या. या प्रवासादरम्यान माडखोल सापळे स्टॉप जवळ त्यांची बॅग रस्त्यात पडली. पण त्यांच्या लक्षात आले नाही. नेमक्या याचवेळी सांगेली सरपंच लवु भिंगारे, सांगेली तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत सनाम, मुंबईस्थित अनंत भिंगारे, ॲड. गुरुनाथ आईर सावंतवाडी जात होते. त्यांनी ही बॅग ताब्यात घेऊन बॅगची पाहणी केली असता त्यात श्रीमती मुंनगेकर यांची महत्त्वाची ओळखपत्रे, आधार कार्ड, बँक कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, पोस्ट बँकेचे कार्ड यासह महत्त्वाची कागदपत्रे व रोख रक्कम आढळली.त्यानंतर सदरची बॅग संबंधित महिलेला तात्काळ मिळावी या उद्देशाने सरपंच लवु भिंगारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सावंतवाडी स्थानक गाठून ठाणे अंमलदारश्री देसाई यांच्याकडे सुपूर्त केली. तसेच लवू भिंगारे यांनी आपले मित्र तथा या महिलेच्या गावातील पेंडूर गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष गावडे त्यांच्याशी त्वरीत संपर्क करून या घटनेबाबत माहिती दिली. लवू भिंगारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या सतर्कतेसह प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
ओटवणे प्रतिनिधी









