एनसीईआरटीईची मार्गदर्शक तत्त्वे
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन वाढत असल्याने पालक वर्गातून चिंता व्यक्त होत होती. अभ्यासाचे ओझे कमी करून हसत खेळत शिक्षण देण्यासाठी एनसीईआरटीईने नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. यामध्ये शाळांमध्ये 10 दिवसांचा ‘बॅग फ्री डे’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 10 दिवसांत विद्यार्थ्यांना अभ्यासाऐवजी इतर उपक्रमांद्वारे शैक्षणिक प्रगती साधली जाणार आहे. दर महिन्याच्या एका शनिवारी बॅग फ्री डे आयोजिला जाणार आहे. सहावी ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅग फ्री डे मध्ये सहभागी व्हावे लागणार आहे.
एनसीईआरटीईने 108 पानांचे मार्गदर्शक सूचना पुस्तक काढले. मुलांना आवश्यक कौशल्यांचा परिचय करून देऊन त्यांना साध्या भाषेमध्ये एखादा विषय शिकवावा, असा त्याचा उद्देश आहे. विज्ञान, पर्यावरण व तंत्रज्ञान यामध्ये प्रत्यक्ष पक्षी व प्राणी संग्रहालयाला भेट, गो ग्रीनसाठी सायकल फेरी शाळेच्या आजुबाजूची झाडे व पशु पक्षांची ओळख, सौर ऊर्जा प्रकल्पाला भेट, बायोगॅस प्रकल्पाला भेट, सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यासह इतर प्रकल्पांना भेटी देऊ शकतात. गावांना भेटी देऊन त्यातील हॉस्पिटल, कार्यालये, धर्मादाय संस्था, बँक, रेल्वेस्टेशन यांना भेटी देऊन माहिती जाणून घेऊ शकतात. तर टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करून पुनर्रवापराचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये बिंबवता येऊ शकते.









