अमेरिकेतील अकादमीचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नवी भूमिका बजावणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता बी. साई प्रणीतने निवृत्ती जाहीर करत आपल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन कारकिर्दीवर पडदा टाकला असून अमेरिकेत प्रशिक्षक या नात्याने नवीन कारकिर्दीचा शुभारंभ केला आहे. हैदराबादच्या या 31 वर्षीय खेळाडूला टोकियो ऑलिम्पिकपासून गंभीर दुखापतींशी झुंज द्यावी लागल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला. 2017 मध्ये त्याने सिंगापूर ओपन जिंकण्यात यश मिळविले होते.
प्रणीत आता नवीन डावाला सुऊवात करणार असून तो पुढील महिन्यात अमेरिकेतील ट्रँगल बॅडमिंटन अकादमीचा मुख्य प्रशिक्षक म्हणून ऊजू होणार आहे. दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत प्रणीतसाठी काही चांगले क्षणही चालून आले. त्यात 2017 ची सिंगापूर ओपन सुपर सिरीज जिंकणे आणि बासेल, स्वित्झर्लंड येथे झालेल्या 2019 च्या जागतिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावणे हे सर्वांत लक्षणीय राहिले.
प्रणीत जागतिक क्रमवारीत 10 व्या क्रमांकावर पोहोचला होता आणि टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता, पण तेथे तो छाप पाडू शकला नाही. सर्व सामने गमवावे लागून गट स्तरावरच त्याला धक्कादायकरीत्या बाहेर पडावे लागले. प्रणीतसाठी 2019 हे संस्मरणीय वर्ष ठरले. जागतिक स्पर्धेत पदक मिळविणारा पहिला भारतीय पुऊष बॅडमिंटनपटू बनण्यापूर्वी स्विस ओपन सुपर 300 मध्ये तो उपविजेता ठरला होता. त्याच्या या पराक्रमांबद्दल त्याला अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
तथापि, प्रणीतसाठी कोविड-19 महामारीचा काळ हा नुकसानदायी ठरला. कारण अनेक दुखापतींनी त्याला फटका दिला. त्याने 2022 च्या राष्ट्रीय खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकले खरे, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा संघर्ष सुरूच राहून लवकरच तो पहिल्या 100 खेळाडूंमधूनही बाहेर पडला.









