वृत्तसंस्था/ मनिला, फिलिपाईन्स
बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपला मंगळवारपासून येथे सुरुवात होत असून ऑलिम्पिक पदकविजेती पीव्ही सिंधू व वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यविजेता लक्ष्य सेन हे या स्पर्धेत भारताचे प्रमुख आव्हानवीर असतील.
भारताच्या आशा या दोघांवरच जास्त अवलंबून असून या स्पर्धेआधी त्यांनी आपला फॉर्म दाखवून दिला आहे. कोव्हिड 19 मुळे दोन वर्षांच्या खंडानंतर ही स्पर्धा भरविली जात आहे. एचएस प्रणॉयने मात्र दुखापतीमुळे माघार घेतल्याने थोडीशी रंगत कमी झाली आहे. 2018 मध्ये वुहान येथे झालेल्या स्पर्धेत प्रणॉयने कांस्यपदक पटकावले होते. स्विस ओपन स्पर्धेत त्याला किरकोळ दुखापत झाली होती. या स्पर्धेत त्याने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. त्याची गैरहजेरी जाणवणार असली तरी ऑल इंग्लंड स्पर्धेचा रौप्यविजेता लक्ष्य सेनला त्याचा लाभ घेण्याची चांगली संधी मिळाली आहे.
20 वर्षीय सेन सध्या पूर्ण बहरात असून त्याने इंडिया ओपन सुपर 500 स्पर्धा जिंकली तर जर्मन ओपन व ऑल इंग्लंड स्पर्धेत त्याने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. याशिवाय त्याने 2020 मध्ये आशिया सांघिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकही जिंकले आहे. त्याआधी कनिष्ठ विभागात त्याने आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण (2018) व कांस्य (2016) मिळविले आहे. येथे त्याला पाचवे मानांकन असून येथील वरिष्ठ स्तरावरील स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी तो उत्सुक असेल. त्याची सलामीची लढत चीनच्या 22 वर्षीय लि शि फेंग याच्याशी होणार आहे. शि फेंगने ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिमध्ये दोनदा सुवर्णपदक मिळविले आहे. त्यामुळे लक्ष्यला ही लढत सोपी जाणार नाही.
भारताचे पूर्ण लक्ष असेल ते माजी वर्ल्ड चॅम्पियन चौथ्या मानांकित सिंधूवर. 2014 मध्ये गिमेचॉनमधील स्पर्धेत सिंधूने कांस्य मिळविले होते. येथे उतरताना तिने सुपर 300 च्या दोन स्पर्धा जिंकल्या असून त्यात सईद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि स्विस ओपन स्पर्धेचा समावेश आहे. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असणारी सिंधू येथे पदक मिळविण्यास उत्सुक असून तिची सलामीची लढत चिनी तैपेईच्या पै यु पो हिच्याशी होणार आहे. अपेक्षेप्रमाणे निकाल लागत गेल्यास उपांत्यपूर्व फेरीत सिंधूची गाठ चीनच्या हे ब्ंिांग जिआओ हिच्याशी पडण्याची शक्यता आहे.
पुरुष एकेरीत सातव्या मानांकित किदाम्बी श्रीकांतने 2016 व 2020 मध्ये आशिया सांघिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविले असले तरी त्याला वैयक्तिक पदक जिंकता आलेले नाही. यावेळी ती संधी साधण्याचा त्याचा प्रयत्न असेल. त्याची सलामीची लढत मलेशियाच्या एन्ग त्झे याँगशी होईल तर बी.साई प्रणीतची सलामीची लढत चौथ्या मानांकित जोनातन ख्रिस्तीशी होईल. याशिवाय सायना नेहवाल या स्पर्धेत चौथे पदक मिळविण्याचा प्रयत्न करेल. तिचा पहिला सामना कोरियाच्या सिम युजिनशी होईल. याशिवाय आकर्षी कश्यप, मालविका बनसोड, यांचाही यात समावेश आहे. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज-चिराग शेट्टी, एमआर अर्जुन-धुव कपिला यांच्या कामगिरीवरही लक्ष असेल.









