वृत्तसंस्था / लखनौ
उत्तर प्रदेशातील बदायूं येथील जामा मशिदीचे अन्वेषण भारतीय पुरातत्व विभागाकडून पेले जाणार आहे. पुरातत्व विभागाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हिंदूंचे मंदिर तोडून ही मशिद बांधण्यात आली आहे काय, यासंबंधीचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासंबंधी न्यायालयात आवेदन सादर झालेले आहे.
अखिल भारत हिंदू महासभेच्या उत्तर प्रदेश शाखेचे अध्यक्ष मुकेश पटेल यांनी हे आवेदनपत्र न्यायालयात सादर केले आहे. बदायूंतील जामा मशिदीचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी यात करण्यात आली आहे. यात भारतीय पुरातत्व विभाग आणि उत्तर प्रदेश सरकार तसेच जामा मशिद व्यवस्थापन यांना प्रतिवादी करण्यात आलेले आहे. हे आवेदनपत्र सप्टेंबर 2022 मध्येच सादर करण्यात आले होते. ही मशिद पूर्वी निलकंठ महादेव मंदिर म्हणून ओळखली जात होती. ते एक प्राचीन मंदिर आहे. नंतर मुस्लीम आक्रमकांनी या मंदिराचे रुपांतर मशिदीत केले. त्यामुळे हे स्थान हिंदूंना मिळाले पाहिजे, असे आवेदनदाराचे म्हणणे आहे.
15 दिवसांचा कालावधी
न्यायालयात पुरातत्व विभागाच्या विधीज्ञांनी या मशिदीचे सर्वेक्षण करण्यास मान्यता दिली. त्यामुळे न्यायालयाने तशी सूचना केली. आता लवकरच हे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर पुरातत्व विभाग आपला अहवाल न्यायालयात सादर करणार आहे. सर्वेक्षणातून या मशिदीची नेमकी स्थिती आणि इतिहास स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे. न्यायालयाने पुरातत्व विभागाला अहवाल सादर करण्याकरिता 15 दिवसांचा कालावधी दिला आहे. पुढील सुनावणी 30 मे या दिवशी होणार आहे.









