सांगली / संजय गायकवाड :
सांगली शहरातील छोटासा पण दिवसरात्र वाहनांची ये जा असणाऱ्या बदाम चौकातही नागरी आणि वाहतूकीच्या समस्या कायम आहेत. या चौकामध्ये भरधावपणे जाणाऱ्या दुचाकी गाड्यामुळे छोटे मोठे अपघात होत आहेत. भरीस भर म्हणून मोकाट जनावरे आणि भटकी कुत्री यासह कचऱ्याचे ढीग आणि कधी तरी साफ होणाऱ्या गटारी असे चित्र या चौकात नेहमीच पहावयास मिळते.
सांगली मिरज कुपवाड शहरात काही चौक खूपच मोठे तर काही चौक अत्यंत लहान आहेत. या चौकाचे भविष्यात रूंदीकरण करायचे म्हंटले तरी शक्य नाही. सांगलीतील अत्यंत छोटा पण खूप महत्त्वाचा आणि वर्दळीचा चौक म्हणून बदाम चौकाची ओळख आहे. सांगलीतील प्रभाग क्रमांक १६ म्हणजेच खणभागात असंख्य गल्ल्या, रस्ते आणि चौक आहेत. बदाम चौक हा त्यातीलच एक चौक आहे.
बदाम चौक हा मुख्य वाहतूकीचा मार्ग नसला तरी शहरातील अंतर्गत वाहतूकीसाठी हा चौक खूपच सोयीचा आणि प्रमुख चौक आहे. सांगलीतील वखारभाग, स्टेशन रोड आणि शहर डीवायएसपी ऑफीसकडून खणभागात येणारी सर्व वाहने ही बदाम चौकातूनच येतात. त्याशिवाय राजवाडयाकडे वळणारी, शहर एमएसईबी ऑफीस, हिराबाग कॉर्नर, खणभाग, नळभाग, लाळगे गल्ली, भोई गल्ली, वॉटर वर्क्स, पंचमुखी मारूती रोडसह रिसाला रोड अशा सर्व दाटलोकवस्ती भागाकडे जाणारे सर्व लोक याच बदाम चौकातून पुढे जात असतात. तसेच खणभागातील जवळपास सर्वच गल्ल्या आणि अगदी हिराबाग कॉर्नर आणि पंचमुखी मारूती रोडकडून सांगलीच्या स्टेशन रोडला क्रॉस करून डीवायएसपी ऑफीजवळून वखारभाग, तसेच राजवाडा चौक, स्टेशन रोड, मिरज, माधवनगर, कॉलेज कॉर्नर अशा भागाकडे जाणारे लोकही बदाम चौकाचाच वापर करतात.
सांगलीच्या राजवाडयात अनेक शाळा, कॉलेज, शासकीय निमशासकीय कार्यालये, अप्पर तहसिल कार्यालय, कारागृह तसेच न्यायालयाशी संबंधित कामे करणारे लोक आणि टायपिंगची दुकाने आदीमुळे राजवाडयात प्रवेश करणारे व वाडयातून बाहेर जाणारे विशेषतः शाळा कॉलेजचे शेकडो विद्यार्थी आणि सायकलरवार हे बदाम चौकातून पुढे रटेशन रोड तसेच खणभागाकडे जात असतात. त्यामुळे बदाम चौकात रिसाला रोडप्रमाणेच शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस सकाळी दहा ते बारा व सायंकाळी पाच ते साडेपाच या वेळेत सायकली, दुचाकी गाड्या आणि रिक्षांची मोठी ये जा असते.
बदाम चौकानजीकच जुनी पोलीस लाईन, सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सीआयडी ऑफीस आदी कार्यालयेही आहेत. त्यामुळे बदाम चौकात दिवसरात्र वाहनांची ये जा सुरू असते. बदाम चौकात बरोबर मध्यभागी बदामाचे झाड आणि या झाडाखाली षटकोनी आकाराचा कट्टा आहे. या कट्ट्यानजीक दिवसा सरबताचे गाडे तर रात्री येथे खाद्यपदार्थांचे गाडे उभे असतात. गाड्यांच्या समोर दुचाकी उभ्या असतील तर अन्य वाहनांना ये जा करताना अडचणी निर्माण होतात.
बदाम चौकात दर रविवारी मोठा आठवडी बाजार भरतो. पुर्वी हा बाजार दिवसभर असायचा पण हल्ली दिवसातून काही तासच बाजार भरतो. बाजारादिवशी हिराबाग कॉर्नरपासून शहर एमएसईबी कार्यालय व पुढे बदाम चौकातून स्टेशन रोडकडे जाता येत नाही. बदाम चौकाच्या एका कोपऱ्यावर रिक्षा थांबा आहे. एका बाजूला खच्छतागृह तर समोर राजवाडयाच्या आतमध्ये जाताना कोपऱ्यात खेळाच्या मैदानालगत भिंत आहे. या भिंतीजवळच लोक कचरा टाकतात. हा कचरा मोकाट जनावरे आणि भटकी कुत्री विरकटून टाकतात. शहराच्या अन्य भागाप्रमाणेच बदाम चौकातही भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कधी कधी ही कुत्री दुचाकीस्वारांच्या मागे लागतात. कुत्र्यांच्या भितीने येथे यापुर्वी काही वाहनचालक गाडीवरून पडून अपघात व जखमी झाल्याची उदाहरणे आहेत.
- वाहनांच्या वेगावर नियंत्रण हवे…!
बदाम चौकात दुचाकी गाड्या अणि रिक्षांची मोठी ये जा आहे. शाळा कॉलेज भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस वाहनांची येथे गर्दी असते. अशावेळी काही वाहनचालक हे अतिशय भरधावपणे चौकातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी पायी निघालेल्या लहान मुले, वृध्द आणि महिलांना अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनांच्या वेगावर येथे नियंत्रण हवे.
-अरिफ कच्छी, बदाम चौक, सांगली








