महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावात झालेल्या भूस्खलनामध्ये खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याची माहीती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुसळधार पावसामुळे रात्री उशिरा भूस्खलन झाल्याने किमान 12 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पावसाळी अधिवेशनात बोलताना उपमुक्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “इर्शाळवाडी येथील घटना दुर्दैवी आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून खराब हवामान आणि मुसळधार पावसाने आव्हाने उभी राहीली आहेत. दरड कोसळलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पायी दीड तासापेक्षा जास्त वेळ चालत जावे लागते. एनडीआरएफचे पथक पायीच पहाटे ४ वाजता घटनास्थळी पोहोचले. 60 NDRF चे कर्मचारी हाताने सुरू असलेल्या बचाव कार्यात सामील झाले आहेत.” अशी त्यांनी माहिती दिली.
पुढे बोलताना त्यांनी “बचाव कार्यासाठी तैनात भारतीय हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे मुंबई विमानतळावरून उड्डाण करू शकले नाहीत. आम्ही जलद बचाव कार्यासाठी 1. 2 टन वजनाच्या दोन जेसीबी मशिन्स एअरलिफ्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू झाले आहे.” अशी माहीती त्यांनी दिली








