तातडीने ड्रेनेजची दुरुस्ती करा : बार असोसिएशनने लक्ष देण्याची मागणी
बेळगाव : जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात समुदाय भवनाचे काम सुरू आहे. या समुदाय भवनावर दुसरा मजला उभारण्यात येत आहे. याचबरोबर लिफ्टदेखील बसविण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू आहे. तेथे असलेला ड्रेनेजचा चेंबर फुटल्याने ड्रेनेजचे पाणीही मुख्य रस्त्यापर्यंत वाहत आहे. प्रवेशद्वारासमोरच पाणी साचून आहे. यामुळे वकिलांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्या पाण्याला इतरत्र वळवावे. याचबरोबर काम लवकर पूर्ण करावे आणि ड्रेनेजचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून समुदाय भवनाचे काम सुरू करण्यात आले आहे. दुसऱ्या मजल्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्या ठिकाणी माती, विटा, खडी आदी साहित्य टाकण्यात आले आहे. याचबरोबर खोदाईही झाली आहे. त्यामुळे वकिलांना ये-जा करतानाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. घाईगडबडीत असलेल्यांना त्याचा फटका बसत आहे. काम सुरू असतानाच आता ड्रेनेजचा चेंबर फुटला आहे. त्यामुळे पाण्याचा लोंढा मुख्य प्रवेशद्वारापर्यंत लागला आहे. त्या ठिकाणी असलेल्या ख•dयांमध्ये पाणी साचून आहे. त्यामुळे ये-जा करणे देखील अवघड झाले आहे. वाहनेदेखील त्यामधूनच चालविण्यात येत आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांवर पाणी शिथडत आहे. तेंव्हा याबाबत बार असोसिएशनने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.